मंगल कार्यालयांना ५० टक्के क्षमतेने व जास्तीत जास्त १०० नागरिकांना उपस्थितीत लग्न समारंभ करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी निर्देश देण्यात आले आहेत.
बँड पथकासह मंगल कार्यालयांमध्ये उत्साह
लग्न सोहळ्यात २०० जणांच्या उपस्थितीस मुभा दिल्याने मंगल कार्यालयांत लग्न सोहळा पार पडणार असल्याने त्यांच्या व्यवसायाला उभारी मिळणार असून, बँड पथकांनाही रोजगार मिळणार असल्याने या दोन्ही व्यवसायातील मंडळींमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे बघावयास मिळत आहे.
लग्नाच्या तारखा
दक्षिणायन आरंभ झाल्यानंतर लग्नाचे मुहूर्तच नसतात. परंतु चातुर्मासात ज्यांना अत्यंत आवश्यक असेल त्यांच्यासाठी आपत्कालीन मुहूर्त म्हणून ऑगस्ट महिन्यात ८, २०, २१, २७, नवरात्रानंतर ऑक्टोबमध्ये ८, १०, ११, १२, १८, १९, २०, २१ आणि २४ या तारखा लग्नासाठी शुभ आहेत.
लग्न समारंभासाठी या आहेत अटी
लॉन -
खुल्या प्रांगणातील /लॉनवरील किवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण/लॉन/
मंगल कार्यालय/ हॉटेलमधील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. खुल्या प्रांगण/लॉनमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत आहे.
मंगल कार्यालय -
बंदिस्त मंगल कार्यालय किंवा हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादित आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे, याची खातरजमा करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्याला तपासणीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
लॉन, मंगल कार्यालयामध्ये विवाह सोहळ्यात निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल, कार्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित हॉटेल, मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. मंगल कार्यालय, हॉटेल, लॉन व्यवस्थापन, भोजन व्यवस्थापन, बँडपथक, भटजी, फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधित सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण होणे अनिवार्य आहे. त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक करण्यात आले आहे.