हर्षनंदन वाघ, ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि.२२ - स्वस्त धान्य दुकानदारांना कमिशनमधून दुकाने चालविणे परवडत नसल्यामुळे त्यांच्यावर आता भाजीपाला घ्याहो...भाजीपाला.. अशी म्हणण्याची वेळ आली आहे. याबाबत राज्य शासनाने रेशनदुकादारांना भाजीपाला विकण्याची मुभा दिली आहे.
रेशनदुकादारांना मिळणा-या कमिशनमधून दुकाने चालविणे परवडत नसल्यामुळे कमिशन वाढवून देण्याची मागणी रेशन दुकानदारांकडून केली जात होती. मात्र राज्य सरकारने कमिशन वाढवून देण्याएवजी त्यांना अन्य वस्तू विक्री करण्याची परवानगी दिली आहे. रेशन दुकानात आतापर्यंत रॉकेल, साखर, डाळी, गहू, तांदूळ यांच्या विक्री करण्याची मुभा होती. राज्यात शासनाने भाजीपाला, फळांची विक्री नियममुक्त केली आहे. शेतकºयांना बाजार समित्यांशिवाय देखील फळे, भाजीपाला विक्री करता येणार असल्यामुळे या नियमानुसार रेशन दुकानदारांनाही भाजीपाला विक्री करता येणार आहे. याबाबत शासनाने परवानगी दिली असून अन्न व नागरी पुरवठा विभागाने यासंदर्भात आदेश शुक्रवारी जारी केला आहे.
दिवाळीनिमित्त रवा, मैदा, बेसनही विकणार
रेशन दुकानदारांना भाजीपाला विक्री करण्याची परवानगी दिली असून दिवाळीच्या मुहुर्तावर रवा, मैदा, बेसनही विकाता येणार आहे. मात्र या वस्तू विक्रीची परवानगी अस्थायी स्वरूपाची आहे. त्यामुळे येणा-या काही दिवसात सर्वसामान्य व्यक्तींना रेशनदुकानात भाजीपाला शिवाय रवा, मैदा व बेसन विकत घेता येणार आहे.
रेशन दुकानदारांना कमिशनमधून दुकाने चालविणे परवडत नसल्यामुळे रेशन दुकानदारांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. त्या योजनेचा एक भाग म्हणून रेशन दुकानदारांना भाजीपाला विक्रीची परवानागी देण्यात आली आहे. -राजेश अंबुसकर,, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकान संघटना, बुलडाणा.