बुलडाणा, दि. ५- पिण्याच्या पाण्यामध्ये रासायनिक घटकांचे वाढलेले प्रमाण घातक आहे. ही बाब लक्ष घेऊन पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांच्या रासायनिक तपासणीचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. भूवैज्ञानिक विभागाच्यावतीने ५७ पाणलोट क्षेत्रामध्ये १६७ जुन्या निरीक्षण विहिरींसह ११४६ नव्या निरीक्षण विहिरींची पाणी तपासणी केली जात आहे. यात दूषित पाणी नमुने आढळलेले गाव भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) द्वारे नकाशावर दर्शविण्यात येणार आहेत.काही गावांमध्ये पाण्यातील रासायनिक घटकांची तपासणी गतवर्षी करण्यात आली. यात प्रत्येकी चारशे स्रोतांचे नमुने तपासल्यानंतर पिण्याच्या पाण्यामध्ये बाधित स्रोतांची संख्या व रासानियक घटकांचे प्रमाण वाढलेले आढळून आले. ही बाब गांभीर्याने घेऊन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या विभागीय प्रयोगशाळा यांच्यामार्फत पिण्याच्या पाण्यातील एचपी, सॉलीड, फ्लोराइड, नाईट्रेड, आयर्न हे पाच घटक तपासण्यात आले. यात २५0 गावांचे जीआयएस मॅपिंग करण्याचे काम टप्याटप्यात पूर्णत्वास गेले आहे.यावर्षी १३ तालुक्यात १४२0 गावांतील ११४६ निरीक्षण विहिरींची नव्याने निवड करण्यात आली आहे. यातील नियमित पाणी तपासणी जलसुरक्षकांकडून केली जाणार आहे. पाणी नमुने गोळा करून जलसुरक्षकांकडून भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळांमध्ये पाठविले जाणार आहे. ज्या गावांतील विहिरीचे पाणी नमुने दूषित आढळले, ते गाव जिल्ह्याच्या नकाशावर जीआयएस प्रणालीत दर्शविण्यात येणार आहे. याबाबात लवकरच मोहीम राबविण्यात येणार आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून चांगल्या आणि दूषित पाणी नमुन्याचे गाव जिल्ह्याच्या नकाशावर विविध रंगामध्ये दर्शविण्यात येते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोणत्या ठिकाणचे पाणी नमुने हे दूषित आहे, गुणवत्तापूर्ण आहे, याचा अभ्यास करण्यासाठी ही बाब फायद्याची ठरते. शिवाय जिल्ह्याचे पेयजलाबाबतचे धोरण ठरविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची संधी उपलब्ध होते.काय आहे 'जीआयएस मॅपिंग'?पाण्याचे जैविक व रासायनिक असे दोन नमुने घेऊन ते प्रयोगशाळेमार्फत तपासून त्याचा पिण्यास वापर होत असल्याची निश्चित करण्यात येते. तसेच हंगामी, बारमाही, बंद असलेल्या जलस्रोत निश्चिती, यानंतर गाव, वस्ती, तांडे येथील पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे अक्षांश, रेखांश काढणे, पिण्यायोग्य पाण्याच्या स्रोतांना सांकेतांक देण्यात येते. त्याचबरोबर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची सद्यस्थितीविषयी नकाशे तयार करण्यात येते.
आता नकाशावर दूषित पाण्याचे गाव!
By admin | Published: March 06, 2017 1:54 AM