गेले वर्ष कोरोनाच्या धास्तीत गेले. कधी अनलॉक तर कधी लॉकडाऊन अशा चक्रात बुलडाणा शहरच काय संपूर्ण जिल्हा अडकलेला होता. गेल्या १५ दिवसांत हॉटेल, छोटी उपहारगृहे सुरू झाली होती. अर्थचक्र फिरावयास लागले होते. हॉटेल्सध्येही गर्दी वाढू लागली होती. मात्र, पुन्हा तिसऱ्या स्तराचे निर्बंध सोमवारपासून लागू करण्यात आल्यामुळे सकाळी ७ ते ४ या वेळेतच ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स सुरू राहतील. वीकेंडला मात्र हॉटेल्समध्ये जाऊन जेवण करण्याच्या मनसुब्यांवर आता पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायाला फटका बसणार आहे.
-- ५ कोटींची उलाढाल ठप्प--
जिल्ह्यात छोटी-मोठी मिळून जवळपास ३ हजारांच्या आसपास हॉटेल्स असून त्यावर सुमारे ५ हजार जणांचे अवलंबित्व आहे. यामधून वर्षाकाठी ५ कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. कोरोनामुळे हे संपूर्ण अर्थचक्र ठप्प झाले आहे. आता वीकेंडलाही हॉटेलिंग बंद राहणार असल्याने आर्थिक उलाढाल ठप्प होऊन घरातच वीकेंड साजरा करावा लागणार आहे.
--१०५ लघु व्यावसायिकांचेही नुकसान--
बुलडाणा शहरात १०५ लघु व्यावसायिक पाणीपुरी, भेळ विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे साधारणत: ३ व्यक्ती कामाला आहेत. शनिवार, रविवारला प्रामुख्याने यांचा व्यवसाय अधिक होतो. मात्र, आता वीकेंडला सर्वच बंद राहणार असल्याने त्यांच्यासमोरही समस्या आहेत.
--कोरोनामुळे मोठा फटका बसला--
कोरोनामुळे गेल्या वर्षभरात मोठा फटका बसला. वार्षिक दीड लाखांची उलाढाल ठप्प होऊन कर्जबाजारी व्हावे लागले. आता कसेबसे सुरू झाले होते. पण पुन्हा निर्बंध आले आहेत. सर्वकाही पूर्वपदावर येण्यासाठी बराच कालावधी लागले. असे बुलडाणा येथील खाद्य उद्योगातील केदार राजुरिया यांनी सांगितले.