चिखली शहरासह तालुक्यात सर्वत्र गत १० दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिखलीची वाटचाल ‘हॉटस्पॉट’च्या दिशेने सुरू आहे. या पृष्ठभूमीवर स्थानिक प्रशासनाने संचारबंदी आणि इतर खबरदारीच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीनंतर तालुक्यात सद्य:स्थितीत दिवसाकाठी सरासरी ३३ रुग्णांची भर पडत आहे. २१ फेब्रुवारी रोजी शहर व तालुक्यात ८८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संखा ४२४ झाली आहे. २० फेब्रुवारी रोजी २३, १९ फेब्रुवारीला २७, १८ फेब्रुवारीला ३०, १५ फेब्रुवारीला २३, १४ फेब्रुवारीला २७, १३ फेब्रुवारीला १४, १२ फेब्रुवारीला १८, आणि ११ फेब्रुवारीला १२ याप्रमाणे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. २० फेब्रुवारीपर्यंत शहरात २१७, तर ग्रामीण भागात ११९ कोरोना रुग्ण आढळले होते. संचारबंदी आदेश लागू झाल्यापासून शहरात नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन होत असल्याचे दिसून येत आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासह, मास्क व सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. आठवडी बाजार स्थगित केला असल्याने सोमवारी शहरात कोणीही बाजारासाठी येऊ नये, असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
...तर आणखी कठोर निर्बंध लागू होतील!
शहरासह तालुक्यातील रुग्णवाढीचा वेग पाहता तालुक्याची ‘हॉटस्पॉट’च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. रुग्णवाढीचा हा वेग असाच कायम राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे. या पृष्ठभूमीवर आता सर्व दुकाने, आस्थापनांची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५, अशी करण्यात आली आहे. सोबतच सर्व प्रकारच्या शाळा, खाजगी कार्यालयात केवळ १५ टक्के उपस्थिती, मंदिरात एका वेळी केवळ १० जणांना प्रवेश, विवाह सोहळ्यासाठी केवळ २५ लोकांना परवानगी, आदी निर्बंध घालण्यात आले आहेत.