लोणार : काेराेना रुग्णांची वाढत असल्याने राज्यभरात संचारबंदीसह कडक निर्बंध लादण्यात आले आहे़ संचारबंदीतही अनेक नागरिक विनाकारण फिरत असल्याने लाेणार तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या दरराेज वाढतच आहे़ ७ मे पर्यंत लोणार तालुक्यात ३ हजार १९५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस चिंता वाढत चालली आहे.
ग्रामीण भागात पाहीजेत तशा उपयोजना नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जनतेने जर वेळीच कोरोना नियम न पाळल्यास वाढती रुग्णसंख्या व आरोग्य व्यवस्थेवरिल वाढता ताण बघता येणारे दिवस तालुक्यासाठी अजून वाईट असू शकतात असे एकंदरीत चित्र दिसते आहे. सध्या कडक लॉकडाऊन असूनही तालुक्यात दररोज ७० ते ८० रुग्ण आढळत आहेत़ यामध्ये तरुणांचे प्रमाण चिंताजनक आहे़ आज रोजी तालुक्यात ५०५ रुग्ण उपचार घेत असून २हजार ६९० रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत हिच एक समाधानाची बाब आहे. तालुक्यात गेल्या वर्षभरात आतापर्यंत १५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू होणाऱ्या रुग्णात वयोवृद्ध रुग्ण व सहविकार असलेले बहुतांश रुग्णाचा समावेश आहे. लोणार तालुक्यातील एकमेव असलेले कोविड केअर सेंटर सध्या रुग्णानी पूर्ण भरले असून येथे कार्यरत सर्व डॉक्टर व कर्मचारी वाढत्या रुग्णसंख्येने हैराण झाले आहेत. त्यातच लोक कोरोना नियमावली पाळत नसल्याने रुग्णसंख्या भयावह पध्दतीने वाढते आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कडक धोरण अवलंबण्याचे गरज या निमित्ताने प्रकर्षाने जाणवते आहे. परंतु लोकांच्या बेशिस्त वागणुकीमुळे प्रशासकीय यंत्रणा सुध्दा त्रस्त झाली आहे़ दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत १५ वर्षांखालील बालकांचे प्रमाण अजून चिंता वाढली आहे़ या बालकांसाठी वेगळी उपचार व्यवस्था तालुक्यात प्राधान्याने सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
रुग्ण दुपटीचे प्रमाण ३२ दिवसांवर
कोरोना रुग्ण दुप्पट वाढीचे प्रमाण ३२ दिवसांवर आले आहे़ आगोदर १०० दिवसांवर होते. लाॅकडाऊनचा फरक पडला नसल्याचे एकूणच परिस्थिती पाहता दिसून येते.