- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : कोरोना सोबतच अन्य आजार डोके वर काढत असून, बुलडाणा जिल्ह्यात डेंग्यूचे आतापर्यंत तब्बल ५१६ रुग्ण झाले आहेत. पावसाळ्यानंतर साथरोग उद् भवण्याची शक्यता आरोग्य विभागाने आधीच व्यक्त केली होती. आता मात्र, डेंग्यू रुग्णांची संख्या कमी होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत असते. डासांची उत्पत्ती आणि वाढीस पोषक वातावरण असल्याने सप्टेंबर ते नाेव्हेंबर या काळात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढते. डिसेंबरमध्ये तापमानात घट झाल्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होत जातो. तसा डेंग्यूचा प्रसारही थांबतो. बुलडाणा जिल्ह्यात चालू वर्षात आतापर्यंत ५१६ रुग्णांची नोंद झाली आहे. डेंग्यूचे रुग्ण दाखल असल्याची माहिती खासगी रुग्णालयांतून दिली जात नाही. डेंग्यूसारख्या सर्वच आजारांची माहिती तत्काळ स्थानिक स्वराज्य संस्थांना देणे बंधनकारक आहे. मात्र, काही रुग्णालयातून ती नियमितपणे दिली जात नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आता कोरोना पाठोपाठ डेंग्युचा धोका जिल्ह्यात निर्माण झाला आहे.
यावर्षी डेंग्यू रोगाची साथ आटोक्यात आहे. लवकरच रुग्णसंख्या झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, आता घाबरण्याचे कारण नाही. - डाॅ. एस.बी.चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी, बुलडाणा.