नाना हिवराळे / खामगाव ( बुलडाणा)खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतमाल विक्रीस आणणार्या शेतकर्यांसाठी बाजार समितीने शिदोरीगृहाची व्यवस्था केली असून, येथे शेतकर्यांना केवळ १ रुपयात जेवन मिळते; मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन अत्यल्प उत्पन्न झाल्याने शिदोरीगृहात जेवनासाठी येणार्या शेतकर्यांची संख्या ५0 टक्क्यांनी रोडावली आहे.अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून समाजात अनेकजण अन्नदान करीत असतात. शेतकरी हा सर्वांचा पोशिंदा समजला जातो. शेतकरी सुखी तर जग सुखी, असेही म्हटले जाते. वर्षभर शेतात मेहनत करुन शेतमाल विकून आपला जीवनगाडा शेतकरी ओढत आहेत. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीस आणताना शेतकर्यांना जेवनाची सेवा देता यावी, या उदात्त हेतूने खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या पुढाकाराने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात स्व.सुलोचनादेवी सानंदा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिदोरीगृह उभारण्यात आले.१४ ऑगस्ट २0१३ पासून सुरु झालेल्या या शिदोरीगृहात शेतकर्यांची दररोज मोठय़ा प्रमाणात गर्दी होती. वरण, भात, पोळी व भाजी असे जेवन दिल्या जाते, तर गुरुवारी गोड पदार्थ बनविल्या जातात. गतवर्षी दररोज ४00 ते ५00 दरम्यान शेतकरी जेवनासाठी येत असत; मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थितीने शेतकर्यांजवळ शेतमालच विक्रीसाठी नाही. एकरी एक ते दीड पोते सोयाबीन झडती झाली आहे, तर उडीद, मूग, ज्वारी, तीळ व मका ही पिकेही नगण्य स्वरुपात आली आहेत. परिणामी बाजार समितीत येणार्या शेतकर्यांची संख्या ५0 टक्क्यांनी घसरली आहे. शिदोरीगृहात सद्यस्थितीत केवळ १२५ ते १५0 पर्यंत शेतकरी जेवनासाठी येत आहेत. एक रुपयात जेवन असतानाही शेतकर्यांची संख्या घटली असल्याने यापुढील दिवस शेतकर्यांसाठी कठीण जाण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.बाजार समितीच्यावतीने शेतकर्यांसाठी एक रुपयात शिदोरीगृहात जेवनाची व्यवस्था केली आहे. ज्या शेतकर्यांना जेवनाचे कुपन संबंधितांकडून मिळत नसेल त्यांनी बाजार समितीकडे तक्रार करण्याचं अवाहन खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एम.एन.भिसे यांनी केले आहे.
शिदोरीगृहात शेतक-यांची संख्या रोडावली!
By admin | Published: December 28, 2014 12:24 AM