अझहर अली
संग्रामपूर (बुलढाणा) : वादळी वाऱ्यासह पाऊस तसेच ढगाळ वातावरण निसर्ग अनुभव कार्यक्रमात अडसर ठरल्याचे कारण पूढे करून वन्यप्राण्यांची आकडेवारी गूलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. वरिष्ठ स्तरावरून अभयारण्यात वास्तव्यास असलेल्या वन्य प्राण्यांची माहिती जाहीर करण्यात येणार असल्याने वरीष्ठ अधिकाय्रांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सततच्या पावसाने अभयारण्यात जागोजागी पाणी साचल्याने वन्यप्राण्यांनी पाणवट्यांवर येणे टाळले. असा कयास लावण्यात येत आहे. त्याअनुषंगाने प्राण्यांच्या नोंदी घेण्यात प्रचंड अडचणी निर्माण झाल्याची माहिती वन्यजीव विभागाने दिली आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात शुक्रवारी बुद्धपौर्णिमेच्या रात्री दरवर्षी प्रमाणे यंदाही निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून वादळीवाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याने जंगलात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वन्यप्राण्यांनी पाहिजे त्याप्रमाणात दर्शन दिले नसल्याचे बोलल्या जात आहे. अंबाबरवा अभयारण्यात ५ मे शुक्रवार ला दुपारी ५ वाजता पासून ६ मे शनिवारी च्या सकाळी ८ वाजेपर्यंत निसर्ग अनुभव कार्यक्रम राबविण्यात आला. या कालावधीत जंगल सफारी बंद ठेवण्यात आली होती. वन्यजीव विभागाकडून करण्यात आलेल्या प्राणी गणनेत वाघ, बिबट, अस्वल, नील गाय, सांबर, भेडकी, गवा, रान डुक्कर, लंगूर, माकड, रान कोंबडी, रान मांजर, मोर, ससा, सायाळ अशा असंख्य प्राण्यांनी दर्शन दिल्याची माहिती आहे. मात्र वन्यजीव विभागाने याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध न करता वरिष्ठ स्तरावर पाठविल्याची माहिती विश्वासनीय सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. प्राप्त माहितीनुसार अकोट येथील उपवनसंरक्षक कार्यालयाकडून १५ मे पर्यंत वन्यप्राण्यांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. निसर्ग अनुभव कार्यक्रमाच्या पुष्ठभूमीवर अभयारण्यात ८ नैसर्गिक २७ कुत्रिम असे एकूण ३५ पाणवठ्यावर ३५ मचान उभारण्यात आले. विविध बिट मधील ३५ मचानवरून वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. या प्राणी गणनेसाठी १९ वनरक्षक, ५ वनपाल, ४ विशेष व्याघ्रदलाचे जवान ४२ मजूर कर्तव्यावर होते. यावर्षी अभयारण्यात निसर्ग अनुभव कार्यक्रमात प्रवेश नाकारण्यात आल्याने निसर्ग व प्राणी प्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्यावर्षी वाघांसोबत ८०१ प्राण्यांची नोंदी
अंबाबरवा अभयारण्यात शुक्रवारी पार पडलेल्या प्राणी गणनेत वन्यजीवांची संख्या गूलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. गतवर्षी सन २०२२ मध्ये अंबाबरवा अभयारण्यात ८०१ वन्य प्राण्यांनी दर्शन दिले होते. यामध्ये ६ वाघ, ६ बिबट, १५ अस्वल, २ तडस, ७० नील गाय, ४९ सांबर, २८ भेडकी, ४८ गवा, १७२ रान डुक्कर, २ लंगूर, १५५ माकड, ११ म्हसण्या उद, ५४ रान कोंबडी, १ रान मांजर, १५१ मोर, १० ससा, १२ सायाळ, २ कोल्हा, ७ लांडगा असे एकूण ८०१ प्राण्यांची नोंद आहे. यावर्षी मात्र वन्य प्राण्यांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून त्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने जंगलात अनेक ठिकाणी पाणी साचले. तसेच ढगाळ वातावरणामुळे अभयारण्यात निसर्ग अनुभव कार्यक्रमामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत.- सुनील वाकोडेवन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव)सोनाळा ता. संग्रामपूर