जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद, शेगाव असे सात आगार आहेत. कोरोनाआधी एसटी महामंडळाची सातही आगारांची रोजची प्रवासी संख्या एक लाखापेक्षा जास्त होती. सद्य:स्थितीत ही संख्या ७० ते ७५ हजारांवर आली आहे. यावरून कोरोना आजाराच्या वाढत्या रुग्णसंख्येचा एसटी प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे एसटीची प्रवासी संख्या जवळपास २५ टक्क्यांनी कमी झाली आहे. जिल्ह्यातील सातही आगारांतून दररोज १५ हजारांपेक्षा जास्त प्रवासी कोरोनापूर्वी प्रवास करीत होते. यामुळे एसटीच्या उत्पन्नात भरमसाट वाढ झाली होती. मात्र, जिल्ह्यात २० फेब्रुवारी रोजी कोरोनाच्या रुग्णसंख्येने तीनशेचा आकडा पार केला. यामुळे एसटी महामंडळाने प्रत्येक बसेसच्या चालक-वाहकांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. चालक-वाहकांनी बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना मास्क घातल्याशिवाय चढू देऊ नये, अशा सूचनाही दिल्याचे विभागीय वाहतूक नियंत्रक ए. यू. कच्छवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
...........चौकट.............
एसटीने रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या : १ लाख १० हजार
अनलॉक केल्यानंतरची संख्या : २० ते २५ हजार
एसटीने सध्या प्रवास करणाऱ्यांची संख्या : ७० ते ७५ हजार
......चौकट.........
ना मास्क, ना डिस्टन्सिंग
एसटी महामंडळाने चालक-वाहकांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. असे असले तरी चालक-वाहक मास्क न घालताच प्रवाशांसोबत प्रवास करीत आहेत. खरे पाहिले तर चालक-वाहकांनी स्वत: मास्क घालून प्रवाशांनाही मास्क घालणे बंधनकारक केले पाहिजे. कोरोना वाढत असताना चालक-वाहक प्रवाशांची का काळजी घेत नाहीत, हा संशोधनाचा विषय आहे.
......चौकट.........
अनेक ठिकाणी निम्मे प्रवासी
जिल्ह्यात १५ ते २० दिवसांअगोदर कोरोनाचे प्रमाण कमी होते. परंतु, आठ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे प्रवासी संख्येत घट होताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात प्रवासी निम्म्यावर आले आहेत. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन एसटी महामंडळाने सर्वच कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
......चौकट.........
प्रवाशांच्या काळजीचे काय?
लॉकडाऊन सुरू असताना जिल्ह्यातील सर्वच आगारांतील बसेस बंद होत्या. कालांतराने अनलॉक केल्यानंतर आगाराने काही बसेस सुरू केल्या आहेत. तेव्हापासून आजतागायत बसेस सुरू आहेत. मात्र, सध्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे. तेव्हा एसटी महामंडळाने रोजच्या रोज बसेस धुऊन त्यात सॅनिटायझरची फवारणी करणे बंधनकारक आहे. परंतु, तसे होताना दिसून येत नाही.