लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रारंभी बंद असलेल्या जिल्ह्यातील ९ ते १२वीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. प्रारंभी अवघी सात हजारांच्या आसपास असलेली उपस्थिती आता दीड महिन्यांनंतर ३४ हजारांच्या टप्प्यात पोहोचली आहे.विशेष म्हणजे याकालावधीत एकही विद्यार्थी कोरोनामुळे संक्रमित झालेला नाही, असे शिक्षण विभागातील सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.प्रारंभी २० हजार पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यासाठी संमतिपत्र शिक्षण विभागाला दिले होते. मात्र प्रत्यक्षात सात हजार विद्यार्थीच शाळेत उपस्थित राहत होते. त्यानंतर जसजसी कोरोना संसर्गाची भीती कमी झाली तथा याबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती झाली तसतसा शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आकडा वाढत असून, वर्तमान स्थितीत तो ३४ हजार २२५ झाली आहे. या कालावधीत एकही विद्यार्थी बाधीत झालेला नाही.शाळा सुरू करण्याच्या मोहिमेच्या प्रारंभी सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या केरोना चाचण्या करण्यात आल्या होता. त्यात काही शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रारंभी नऊ शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता टप्प्या टप्प्याने कोरोना संसर्ग टाळण्याच्या उपाययोजना करत नववी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येत असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.
७ हजाराहून ३४ हजारांवर गेली विद्यार्थ्यांची संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2021 12:27 PM