कोरोनामुळे गेल्यावर्षी मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून शाळा बंद झाल्या. इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची अंतिम (वार्षिक) परीक्षा घेता आली नाही. त्यांना पुढील वर्गांमध्ये प्रवेश देण्यात आला. जिल्ह्यात नववीत ४६ हजार २५० विद्यार्थिसंख्या असून, यातील ४५ हजार ४५७ विद्यार्थी उत्तीर्ण दाखविण्यात आलेले आहेत. यापैकी किती विद्यार्थ्यांनी दहावीसाठी अर्ज केले याची माहिती अद्यापही माध्यमिक शिक्षण विभागाकडे प्राप्त नाही. इतर काही नववीतील विद्यार्थिसंख्या आणि दहावीत आलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज यामध्ये तफावत आढळली आहे. मग हे विद्यार्थी गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पटसंख्येचा घोळ
इयत्ता नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण (नापास) केले जात नाही. त्यामुळे इयत्ता पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी हा मध्येच शाळाबाह्य झाला, तरी पटसंख्येसाठी तसे दाखविले जात नाही.
नववीतून दहावीसाठी अर्ज न करणाऱ्या विद्यार्थ्यांची कारणे
१. नववीमध्ये असलेले सर्वच विद्यार्थी दहावी जात नाहीत. त्यामुळे दहावीतील विद्यार्थिसंख्या कमी होते. त्यामागे
कुटुंबातील आई-वडिलांचे आजारपण व इतर अडचणी कारणीभूत असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
२. परराज्य, जिल्ह्यातून रोजगार, नोकरीनिमित्त स्थलांतरित झाल्यामुळे अनेक मुले दुसऱ्या शाळेत टाकली जातात. स्थलांतरण केल्याने काही विद्यार्थ्यांना दहावीमध्ये प्रवेशित होता आले नाही.
३. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे वर्ष आहे; पण यंदा कोरोनामुळे शिक्षणाचे वेळापत्रक आणि स्वरूप बदलले आहे. ऑनलाइन शिक्षणातील मर्यादा, अभ्यास, नीट होत नसल्याने या महत्त्वाच्या वर्षामध्ये कमी गुण मिळतील, अशी भीती काही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी यंदा इअर ड्रॉप घेऊन पुढील वर्षी जोमाने परीक्षेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या स्वरूपातील कारणांमुळे दहावीमध्ये गेल्या वर्षी अनेक विद्यार्थी प्रवेशित झाले नसल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात नववी पास विद्यार्थी - ४५,४५७