- ब्रह्मानंद जाधव
बुलडाणा : परी म्हटलं की, जादू, प्रेम, माया आलीचं. हे सर्व गूण असणारी ‘परी’ संकटकाळात ज्याप्रमाणे मदतीला धाऊन येते; त्याचप्रमाणे वास्तविक जीवनात निर्माण झालेल्या या संकटातही परिचारिकांमधील ‘परी’च धाऊन आली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या या लढ्यात रुग्णांना मृत्यूच्या दारातून वाचविण्यासाठी दिवस-रात्र सेवा देणाऱ्या परिचारिकाही कुठल्या ‘परी’पेक्षा कमी नाहीत.१२ मे रोजी असलेल्या जागतिक परिचारिका दिनाच्या पूर्वसंध्येला परिचारिकांशी संवाद साधला असता त्यांचे कोरोनाच्या या लढ्यातील मोठे योगदान समोर आले. सध्या सर्व जग कोरोनाशी लढत आहे. या लढ्यात कोरोना बाधीत रुग्णांशी थेट संपर्क येतो तो परिचारिकांचा. जिल्हा सामान्य रुग्णालयापासून ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्रापर्यंत अशा सर्वच ठिकाणी काम करणाºया परिचारिका सध्या आपल्या जीवाची पर्वा न करता या कठीण प्रसंगी रुग्णांची सेवा करीत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील काही परिचारिकांशी संवाद साधला असता रुग्ण सेवा करताना आम्हालाच नव्हे, तर संपूर्ण कुटूंबाचा धोका वाढलेला आहे. घरी गेल्यानंतर मुलांना जवळ घेऊ शकत नसल्याने मन भरून येत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. रुग्णालय आणि कुटूंब सांभाळताना परिचारिकांची मोठी कसरत होत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना आल्यापासून आमची परीक्षेची घडीच सुरू झाली. परंतू या परिस्थितीतही एकत्रीत कुटूंब असतांना सर्वांची साथ लाभत आहे. प्रशासनाकडूनही सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत. जागतिक संकटात रुग्णांच्या सेवेचे योगदान देवू शकतो, याचा एक परिचारिका म्हणून मला अभिमान आहे.-सरला देशमुख, अधिपरिचारीका, जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलडाणा.
अनेक परिचारिका कुटूंबाचा गाडा ओढताना घरातल्या सर्वांची काळजी घेऊन रुग्णांना सेवा देत आहेत. सेवा देताना अनेक वाईट प्रसंगही येतात. परंतू रुग्णाला रोगापासून मूक्त करण्यासाठीच परिचारिका आज दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. हा संकटकाळ दूर होणार आहे, प्रत्येकाने काळजी घ्यावी.-सुनंदा फुसे, अधिपरिचारीका, उपजिल्हा रुग्णालय, शेगाव.