- हर्षनंदन वाघ
बुलडाणा : बालकांमधील कुपोषण दूर करून रक्ताशयाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाच्या सहकार्याने महिला व बालविकास विभागाच्या जिल्ह्यातील १५ प्रकल्पाअंतर्गंत २ हजार ७०० अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर १७ व्यक्तींच्या टिमची निवडण्यात येणार आहे. आदिवासी व ग्रामीण भागात कुपोषण मोठ्या प्रमाणात असून बालकांसह किशोरवयीन मुली, महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जन्मत: कमी वजनाचे, कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ० ते ६ वर्षे वयोगटातील खुजे, बुटकेपणाचे प्रमाण कमी करणे, ० ते ६ वर्षे वयोगटातील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, ६ ते ५९ महिने वयोगटातील बालकांमधील रक्ताक्षयाचे प्रमाण कमी , १५ ते ४९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करणे, जन्मत: कमी वजनाचे असणाºया बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून पोषण आहार अभियान सन २०१७-१८ मध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी केंद्र शासन ८० टक्के व राज्य २० टक्के प्रमाणे निधी उपलब्ध करून देणार आहे. सदर अभियान महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणार असून शासनाचे इतर आठ विभाग या अभियानासाठी सहकार्य करणार आहेत. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर अभिसरण समिती गठित करण्यात येणार आहे. त्यात जिल्हाधिकाºयांसह जिल्हा परिषदेच्या विविध विभागचे अधिकाºयांचा समावेश राहणार आहे. तर जिल्हास्तरावर प्रकल्पराबविण्यासाठी जिल्हा समन्वयक १, जिल्हा प्रकल्प सहाय्यक १ व गट समन्वयक म्हणून १५ व्यक्तींची टिम बनविण्यात येणार आहे. सदर टिम अंगणवाडींची समन्वय ठेवणार असून जिल्ह्यातील २ हजार ७१८ अंगणवाडी केंद्रातील बालकांचा, किशोरवयीन मुली व महिलांचा पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबवून घेणार आहे.
उद्दिष्ट गाठण्यासाठी या विभागाचे घेणार सहकार्य
पोषण आहार अभियानअंतर्गंत ठरविण्यात आलेली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिला व बाल विकास विभागासाठी शासनाचे विविध विभाग सहकार्य करणार आहे. त्यात ग्रामविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, नगरविकास विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, खाद्यपोषण आहार बोर्ड, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन आदी विभागाचा समावेश आहे.