लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार चैनसुख संचेती यांच्या विरोधात दाखल आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांनी शनिवारी फेटाळून लावला. त्यामुळे आगामी निवडणुकीत चैनसुख संचेती यांचे आव्हान कायम असल्याचे दिसून येते.संचेती यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना माहिती लपवली असा आक्षेप अपक्ष उमेदवार अभय सिताराम भिडे (रा. नांदुरा) यांनी नोंदविला. त्यात संचेती यांनी विदर्भ विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा न देता उमेदवारी अर्ज दाखल केला. कै. मदनलाल किसनलाल संचेती अशासकीय संस्था मलकापूर या संस्थेतील भ्रष्टाचार प्रकरणी तसेच आचारसंहिता भंग प्रकरणात त्यांना एक हजार रुपये दंड मलकापूर न्यायालयाने ठोठावल्याची माहिती लपविल्याचे नमूद केले होते. सुनावणी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भीडे यांचे सर्व आक्षेप फेटाळून लावत, चैनसुख संचेती यांचा अर्ज वैध ठरविला.याचिकाकर्ते अजय भिडे यांच्यावतीने अॅड. गव्हांदे यांनी बाजू मांडली. चैनसुख संचेती यांच्यावतीने अॅड. हरिश शहा यांनी युक्तीवाद केला. या आक्षेपामुळे मलकापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
पुरावे दाखल न केल्याने फेटाळले आक्षेप!अशासकीय संस्थेतील भ्रष्टाचार प्रकरणी हरकतदारांनी भ्रष्टाचाराबाबत कागदपत्र दाखल केली नाहीत. त्यामुळे हरकत फेटाळण्यात आली. त्याचप्रमाणे आचारसंहिता भंग प्रकरणातही शिक्षा झाल्याचा पुरावा जोडला नसल्याने हरकत फेटाळण्यात आली. तर हरकतदाराने विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असल्याचे नमूद केले. मात्र, या नावाचे कोणतेही महामंडळ अस्तित्वात नसल्याचा संचेती यांच्याकडून युक्तीवाद करण्यात आला. तर प्रतिज्ञापत्रात माहिती लपवून ठेवण्यात आलेली माहिती किंवा चुकीची माहिती दिल्यास नामनिर्देशनपत्र फेटाळता येऊ शकत नाही. नामनिर्देशपत्रासोबत दाखल केल्या शपथपत्राची चौकशी करणे निम्न स्वाक्षरीकर्त्याचे अखत्यारित येत नाही. त्यामुळे ही हरकत फेटाळण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.