बुलढाणा : समृद्धी महामार्गावर अपघात होऊ नये, म्हणून सिंदखेड राजा जवळ स्वामी समर्थ केंद्राच्यावतीने 'मृत्यूंजय महायंत्र' यज्ञ करण्यात आला. महामार्गावरील मृत्युंजय महायंत्राच्या या प्रकारावर आक्षेप घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने निषेध करण्यात आल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली. ते स्थानिक विश्राम गृह येथे २५ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
समृद्धी महामार्गावरील वाढणारे अपघात लक्षात घेता वाहतूक नियमांची अंलबजावणी होणे गरजेचे असल्याचे अविनाश पाटील यांनी स्पष्ट केले. महामार्गावर मृत्युंजय महायंत्र बसविणे, पूजा करणे ह्या सर्व आदीमानव काळातील उपाययोजना आहेत. श्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवूणक या केंद्राकडून होत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. चिखली तालुक्यातील पिंपळगांव सराई या गावाच्या हद्दीत सैलानी बाबांचा प्रसिद्ध दर्गा आहे. या दर्ग्यात दरवर्षी हजारोंच्या संख्येने देशभरातून भाविक येतात. मनोरुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. याठिकाणी मनोरुग्णांच्या अनिष्ट रूढीबाबत प्रबोधन, समुपदेशन व उपचार विषयक कार्यवाही करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने यावेळी करण्यात आली.
मनोरुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र विशेष मनोरुग्णालय सुरु करण्यात यावे, स्वतंत्र रुग्णालय उभे करण्यास लागणाऱ्या कालावधीत जिल्हा रुग्णालयातच स्वतंत्र मानसिक आरोग्य उपचार कक्ष सुरु करावेत, येऊ घातलेल्या यात्रेनिमित प्रबोधन मोहीम राबवावी, उपचार कक्ष सैलानी दर्ग्याजवळील रायपूर प्राथमिक केंद्रात सुरु करण्यात यावे, अशी तातडीची उपाय योजना करण्याची मागणी पत्रकार परिषदेतून अंधद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्रा. डाॅ. संतोष आंबेकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रदिप हिवाळे, प्रधान सचिव पंजाबराव गायकवाड, सुरेश साबळे, अशोक काकडे आदी उपस्थित होते.