लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : घरकुल याेजना राबविताना येणारे अडथळे शासनाच्या महाआवास अभियानामुळे दूर हाेणार आहे. उद्दीष्टाप्रमाणे घरकुलांना १०० टक्के मंजूरी मिळणार असून भूमीहीन लाभार्थ्यांना पंडीत दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.केंद्र शासनाच्या वतीने सर्वांसाठी घरे याेजनेंतर्गंत१०० दिवसात लाभ देण्याचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले आहे. या अभियानातंर्गत कोरोना संसर्ग सुरक्षा नियम पाळून विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्तरीय कार्यशाळेत ग्राम कृती गटाची स्थापना करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांचे तसेच घरासाठी कर्ज घेवू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांसाठी बँक मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. महाआवास अभियान कालावधीत चांगली कामगिरी करणाऱ्या सर्वोत्कृष्ट विभाग, सर्वोत्कृष्ट जिल्हे प्रथम तीन, सर्वोत्कृष्ट तालुके प्रथम तीन, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम तीन व सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत व सर्वोत्कृष्ट गृहसंकुल अशा प्रकारात प्रथम तीन पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट तालुके, ग्रामपंचायत, घरकुल बांधण्यासाठी कर्ज देणारी सर्वोत्कृष्ट बँक शाखा, शासकीय जागा उपलब्धता व वाळू उपलब्धता सर्वोत्कृष्ट प्रथम तीन कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. या अभियानामुळे रखडलेल्या घरकुल याेजनेला गती मिळणार आहे. तसेच जागा नसलेल्या लाभार्थ्यांनाही लाभ देण्यासाठी विविध याेजना राबवण्यात येणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
घरकुल याेजनेतील अडथळे दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 6:02 PM