मेहकर : शासकीय कामात अडथळा करून एसटी चालकाला मारहाण करणाऱ्या आराेपीस मेहकर जिल्हा सत्र न्यायालयाने ९ जानेवारी रोजी सहा महिने सश्रम कारावास व पाच हजार रु. दंड ठोठावला आहे.
मेहकर आगाराची एमएच ४०-८५५४ या क्रमांकाची बस १ सप्टेंबर २०१९ ला सायंकाळी चार वाजता तालुक्यातील डोणगाव बसस्थानकावर आली हाेती़ यावेळी आरोपी हेमराज हरीनारायण शर्मा याने चालक रमेश गंगाराम मोरे सोबत गाडी उभी का केली नाही म्हणून वाद घातला़ तसेच मारहाण केली. याप्रकरणी आरोपीविरोधात डोणगाव पोस्टे.मध्ये गुन्हा दाखल झाला होता.
प्रकरण न्याय प्रविष्ट होऊन ९ जानेवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला तीन वेगवेगळ्या कलमाखाली शिक्षा सुनावली. यात कलम ३५३ नुसार सहा महिने सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, कलम ३३२ नुसार सहा महिने कारावास व पाच हजार रुपये दंड तर कलम २९४ नुसार तीन महिने कारावास व २००० रुपयांची दंड अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. मंगीलवार यांनी सुनावली आहे. सरकारी वकील अॅड. जी. जी. पोकळे यांनी आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या व त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून ही शिक्षा सुनावली आहे.