लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना प्रतिबंध नियमाचा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करीत विवाह सोहळा पार पाडल्या प्रकरणी संबंधितांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. वधू, वरासह १०४ जणांवर हे गुन्हे दाखल झाले आहेत. नियमांचे उल्लंघन करणे वधू-वर पक्षाकडील मंडळींना चांगलीच भोवले आहे.मलकापूर तालुक्यातील जांबुळधाबा येथे १० मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास स्थानिक घाईट परिवार व बोदवड तालुक्यातील मानमोडी येथील पाटील परिवारातील विवाह सोहळा पार पडला. दरम्यान विवाह प्रसंगी वधू- वर पक्षाकडील शंभर ते दीडशे जणांची उपस्थिती होती. यामध्ये मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे सॅनिटायझर चा वापर न करणे, तसेच विवाह सोहळ्याची परवानगी न घेणे या बाबींमुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग झाला. संबंधितास पूर्वसूचना देऊनही योग्य ती काळजी घेतलेली नसल्यामुळे संबंधितांवर साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार व जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कारवाई करण्यात यावी, अशी फिर्याद जांबुळधाबा येथील तलाठी एस. ओ. काळे व पोलीस पाटील प्रकाश इंगळे यांनी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी वर-वधू पक्षाकडील चार जणांसह इतर १०० जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून यामध्ये नव वधू-वराचा सुद्धा समावेश आहे. याप्रकरणी पुढील तपास बीट अंमलदार पोहेका हुसेन पटेल हे करीत आहे. ही कार्यवाही तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी एस. डी. पवार, तलाठी एस. ओ. काळे, पोलीस पाटील प्रकाश इंगळे, कोतवाल निलेश तायडे, दिलीप तायडे आदींनी पार पाडली.
नियमांचे उल्लंघन नियमांचे उल्लंघन करीत पार पडलेला विवाह सोहळा वधु वर पक्षाकडील मंडळींना भोवला. कोरोना प्रतिबंधक नियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग प्रकरणी विविध कलमान्वये १०४ जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यंतरी तहसिलदारांची लग्नासाठी परवानगी आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयाने एका आदेशाद्वारे स्पष्ट केले होते, हे येते उल्लेखनीय.