उद्धव फंगाळ / ऑनलाइन लोकमत
मेहकर (बुलडाणा):, दि. 11 - भक्तीत तल्लीन झाल्यावर मानवाच्या हातून असाध्य कार्य पार पडते याचा प्रयत्न जिल्हावासियांना नुकताच आला. मेहकर येथील ७८ वर्षीय महिलेने कापसाच्या एक लाख वाती बनवून राजूर येथील गणेशाच्या चरणी अर्पण केल्या.
मेहकर येथील शिवाजी नगर स्थित शांता देवराव वानखेडे या ७८ वर्षीय वृद्ध महिलेने, प्रयत्नांती परमेश्वर या भक्तीसाधनेतून कापसाच्या १ लाख वाती बनविण्याचा संकल्प घेतला होता. एक लाख वाती बनविण्याचा संकल्प त्यांनी आपल्या कुटुंबीयांसमोर मांडताच या वयात सदर संकल्प पुर्ण होईल की नाही? असा संशय व्यक्त केला. मात्र, कुटुंबीयांपूढे सदर संकल्प पुर्ण करण्याचा दृढ निश्चय शांताबाई यांनी व्यक्त केला. त्यानुसार त्यांनी वाती बनवायला सुरूवात केली. आपला संकल्प पूर्ण करण्याकरिता त्यांनी दिवसरात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
आपल्या शेतातील कापसाच्या त्यांनी एक लाख वाती तयार केल्या. याकरिता त्यांना सहा महिने वेळ लागला. सहा महिने सातत्याने तहान - भूक विसरून त्यांनी वाती बनविण्याचे कार्य पार पाडले. शिवाजी नगरमधील शांता देवराव वानखेडे यांना लहानपणापासूनच देवाची भक्ती करण्याची आवड आहे. त्या सतत देवाचे नामस्मरण करीत असतात. माळ जपणे, पोथी पारायणमध्ये त्या नेहमी मग्न असतात. त्यांनी कापसाच्या १ लाख वाती बनविण्याचा संकल्प ६ महिन्यात पूर्ण केला आहे. दरम्यान त्यांनी स्वहाताने बनविलेल्या कापसाच्या १ लाख वाती मनोभावे राजूर येथील गणपतीला नुकत्याच अर्पण केल्या आहेत. याप्रसंगी सर्वांनी एकत्र मिळून भगवंत व भगवत कार्यासाठी झिजणे म्हणजेच भक्ती होय, असा धार्मिक संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला आहे.