लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : राज्य शासनाच्या वतीने वृद्ध साहित्यिक व कलावंतांना देण्यात येणारे मानधन थकीत राहिले आहे. परिणामी, जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांची परवड होत आहे. मानधनासाठी या कलावंतांचे संबंधित विभागाकडे सातत्याने चौकशीसाठी हेलपाटे होत आहेत. साहित्य व कला क्षेत्रासाठी ज्यांनी १५ ते २० वर्षे महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे, ज्या कलावंत, साहित्यिकांचे वय ५० पेक्षा जास्त आहे, अशा वृद्ध साहित्यिक व कलावंतांसाठी राज्य शासनाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून मानधन योजना राबविण्यात येते. या योजनेत तीन स्तर करण्यात आले असून, राष्ट्रीय पातळीवरील कलावंत, साहित्यिकास २ हजार १००, राज्य पातळीवरील कलावंतास १ हजार ८००, तर जिल्हा पातळीवरील वृद्ध साहित्य, कलावंतास मासिक दीड हजार रुपये मानधन देण्यात येते.शासनाच्या या योजनेमुळे वृद्ध कलावंतांना उदरनिर्वाहासाठी काही प्रमाणात मदत होत आहे. साहित्यिक, कलावंताचे निधन झाल्यास त्यांच्या पत्नीस अथवा पतीस हयात असेपर्यंत मानधन देण्यात येते. या मानधनाची रक्कम मुंबईच्या संचालक कार्यालयाकडून थेट कलावंतांच्या खात्यावर जमा करण्यात येते.
पूर्वी जिल्हा परिषदेमार्फत कलावंतांच्या खात्यावर मानधन जमा करण्यात येत होते. मात्र, आता थेट मुंबईच्या संचालक कार्यालयाकडून मानधन जमा करण्यात येत आहे. आमच्याकडे मानधन येत नाही. - मनोज मेरत, जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी, बुलडाणा.