लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक जुना सराफा परिसरात एक शिकस्त इमारत कोसळली. यात इमारतीत दबलेल्या एका वृद्ध महिलेला वेळीच बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. दुपारच्या वेळी ही घटना घडल्याने पुढील अनर्थ टळला. तथापि, शिकस्त इमारतीचा मलबा शेजारच्या एका इसमाच्या दुचाकीवर पडल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले. शहरातील जुना सराफा भागात काही शिकस्त इमारती आहेत. यापैकी एक इमारत खासगी औषधालयात काम करणाऱ्या जितेंद्र चव्हाण यांच्या मालकीची असून, या इमारतीत चव्हाण यांच्यासह त्यांची आई, आजी, पत्नी आणि दोन मुली असे एकूण सहा जण वास्तव्यास आहेत. शुक्रवारी दुपारी ११.३५ वाजता दरम्यान इमारत कोसळली. तत्पूर्वी काही विटा आणि मलबा पडून भिंती ढासळत असल्याचे लक्षात येताच, जितेंद्र चव्हाण यांच्या पत्नी शुभांगी चव्हाण, भक्ती (६) आणि आरोही (३) या चिमुकल्या मुलीसहित बाहेर पडल्या. तर वयोवृद्ध आजी सरस्वतीबाई जीवनलाल चव्हाण यांना सकाळीच नातेवाइकांकडे सोडून जितेंद्र चव्हाण कामावर गेले. दरम्यान, ११. ३० वाजताच्या सुमारास चव्हाण यांच्या आई घरात काही सामान आणण्यासाठी गेल्या असतानाच इमारत कोसळली. त्यामुळे त्या घरात अडकून पडल्या. त्यांना शेजारांच्या मदतीने नंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे शिकस्त इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
खामगावातील सराफा परिसरात जुनी इमारत कोसळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 12:19 PM