मे.ए.सो. हायस्कूलमध्ये हिंदी दिवस उत्साहात
मेहकर : स्थानिक मे.ए.सो.हायस्कूल येथे १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी प्राचार्य संध्या कोरान्ने या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक अरविंद चव्हाण, प्रसन्न हजारी व प्रसन्न महाजन यांची उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपात हिंदी कथा कथनाचा उत्तम नमुना सादर केला. संचालन शिवप्रसाद थुट्टे यांनी तर आभार प्रसन्न हजारी यांनी केले.
--
राष्ट्रीय लोक अदालतीचे २५ रोजी आयोजन
बुलडाणा : जिल्हा व जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे २५ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीमध्ये मोटार व्हेइकल ॲक्ट प्रकरणे तडजोडीसाठी मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली असून, त्यात तडजोड शुल्क न्यायालयीन दैनंदिन प्रकियेपेक्षा कमी आकारण्यात येणार आहे. या संधीचा फायदा पक्षकारांनी घेऊन एक मेकांविरुद्ध दाखल किंवा दाखल पूर्व प्रकरणे आपसात तडजोडीद्वारे निकाली काढावी, असे आवाहन अध्यक्ष स्वप्नील खटी, जिल्हा व सत्र न्यायाधीश साजिद आरिफ सय्यद, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा आणि वकील संघाचे अध्यक्ष विजय सावळे यांनी केले.
--
५५० रुपयांची अवैध दारू जप्त
जानेफळ : जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या कळंबेश्वर येथे आरोपी शेख आमीर शेख हारुण हा अवैधरित्या दारूची विक्री करीत होता. त्याच्यावर जानेफळ पोलिसांनी छापा टाकून त्याच्याकडून दारूच्या ९ बाटल्या (किंमत ५५० रुपये) जप्त केल्या. आरोपीविरुद्ध दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
--