सिंदखेडराजा (बुलढाणा) : समृद्धी महामार्गावर १ जुलै रोजी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात झाला होता. या बसचा चालक मद्याच्या नशेत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील फॉरेन्सिक अहवाल आला असून चालक दानिश शेख इसराईल याच्या रक्त नमुन्यामध्ये ०.०३ टक्के अल्कोहोल आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तो मद्याच्या नशेत बस चालवत असल्याची बाब समोर आली आहे.
दरम्यान, आरोपी चालक शेख दानिश शेख इसराईल याला दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर ५ जुलैला पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. अपघात घडल्यानंतर तब्बल १२ तासांनी त्याचे रक्त नमुने घेण्यात आले होते. इतक्या उशिरा रक्त नमुने घेऊनदेखील त्याच्या रक्तात अल्कोहोल आढळून आल्याने त्याने मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन केले होते, हेही स्पष्ट झाले आहे. या घटनेत दानिशबरोबर असलेला बसचा सहचालक, ट्रॅव्हल कंपनीचा मालक यांच्यावरदेखील गुन्हा दखल होऊ शकतो का, हे पाहावे लागणार आहे. घटनेचा अत्यंत बारकाईने तपास केला जात असल्याचे या प्रकरणाचे तपास अधिकारी असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी सांगितले.