- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: ज्या शेतकरी कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येईल त्या दाम्पत्याने मुलीच्या नावे शासनाच्या मदतीने १० वृक्षांची लागवड करण्याचा उद्देशाने ‘कन्या वन समृध्दी योजना’ सुरू केली आहे. योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील १ हजार ५०२ शेतकरी कुटुंबांनी या योजनेचा लाभासाठी अर्ज केलेले आहेत. या पावसाळ्यात या कुटुंबांना वृक्षांचे वाटप केले जाणार आहे. भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादित करण्यासाठी वन विभागाकडून नवनवीन योजना नियमितपणे राबविण्यात येत आहेत. या योजनोंमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग असावा, यासाठी सामान्य लोकांच्या सामाजिक गरजांचे भान ठेवून योजना तयार केल्या जातात. वैश्विक तापमान वाढीचे संकट, त्यामुळे निसर्गामध्ये झालेले फेरबदल, नैसर्गिक आपत्तींमध्ये झालेली वाढ, वाढते प्रदूषण इत्यादी कारणांमुळे पर्यावरणाचे संतुलन आणि जैवसृष्टीची स्थिरता यामध्ये सातत्याने बदल होत आहे. यावर प्रभावी उपाययोजना म्हणून राज्यात विविध माध्यमातून वनक्षेत्र व वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी वनविभागाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. राज्यात ग्रामीण भागात स्वत:ची जमीन असणाºया शेतकºयांना कन्या वन समृद्धी ही योजना लाभकारक ठरणार आहे. ज्या कुटुंबांमध्ये मुलगी जन्माला येईल अशा शेतकरी दाम्पत्याला १० रोपे विनामुल्य देऊन प्रोत्साहित करण्यासाठी २७ जून २०१८ रोजी महसूल व वन विभागाने कन्या वन समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या लाभाकरीता शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंद केल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींकडे अर्ज करणे आवश्यक आहे. त्या शेतकरी दाम्पत्याने मुलीसाठी तिच्या जन्मानंतर येणाºया पहिल्या पावसाळ्यात १ ते ७ जुलै या कालावधीत १० झाडे लावण्याची संमती आहे. त्यानुसार जिल्ह्यातून वर्षभरात १ हजार ५०२ अर्ज वनविभागाला प्राप्त झाले आहेत. आलेल्या अर्जावरून या पावसाळ्यात लाभार्थी कुटुंबाना वृक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. या रोपांचा आहे समावेशपाच रोपे सागाची, दोन रोपे आंबा, एक फणस, एक जांभुळ आणि एक चिंच अशा भौगौलिक परिस्थितीनुसार अन्य प्रकारच्या फळांच्या रोपांचा समावेश कन्या वन समृद्धी योजनेमध्ये आहे. आज पर्यावरण दिन५ जून रोजी पर्यावर दिन साजरा करण्यात येतो. पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला ‘कन्या वन समृद्धी’ योजनेची माहिती घेतली असता जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद या योजनेला मिळत असल्याचे दिसून आले. पर्यावरण, वृक्ष लागवड, संगोपन आणि संवर्धन, जैवविविधता इत्यादीबाबत सध्याच्या आणि भावी पिढीमध्ये आवड व रूची निर्माण करणे, अशा योजनेमधून मुलगा आणि मुलगी समान असून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी सामाजिक संदेश देण्याचा या योजेनचा मूळ उद्देश आहे.