शेगाव (बुलडाणा) शहरात देशी कट्टा विक्रीसाठी आलेल्या एका युवकास मुद्देमालासह अटक करण्यात शेगाव पोलिसांना आज सोमवारी यश आले.उत्तर प्रदेश येथील एक युवक शिवाजी चौक परिसरात हत्यारासह संशयास्पद फिरत असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाला मिळाली. त्यावरून ठाणेदार नंदकिशोर शर्मा यांच्या नेतृत्वात सापळा रचून संशयित युवकाची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल, पाच काडतुसे, मोबाईल व लोखंडी पाना पोलिसांना मिळून आला. या युवकाची चौकशी केली असता सदर युवक रोहितकुमार कन्हैय्यालाल कुशवाह (वय २७) रा. छटिया, जि. कनोज (उत्तरप्रदेश) येथील असून, शहरात तो ग्राहकाला पिस्तूल देण्यासाठी आला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. डीबी पथकाचे प्रमुख रवींद्र सोळंके, हरिदास बोरकर, विलास पवार, भास्कर लवंगे, श्रीराम वसतकार, रघुनाथ जाधव व पोकाँ पवार यांनी ही कारवाई यशस्वी केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध कलम ३, २५ आर्मअँक्ट सहकलम ५ यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला उद्या मंगळवारी शेगाव न्यायालयासमोर हजर करणार आहे.
देशी कट्टय़ासह एकास अटक
By admin | Published: December 30, 2014 12:30 AM