याप्रकरणी मोताळा तहसील कार्यालयात कार्यरत तिघांविरुद्ध मृत व्यक्तीच्या मुलाच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे तर दोन आरोपींचा शोध बोराखेडी पोलीस घेत आहेत.
नंदकिशोर पाखरे असे अटक झालेल्या आरोपीचे नाव असून तो तहसील कार्यालयामध्ये कार्यरत आहे तर संजय पारखेडकर व विनोद अनकुरणे या दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. हे दोघे सुद्धा मोताळा तहसील कार्यालयात कार्यरत आहेत.
मोताळा येथील तहसील कार्यालय तसेच तहसीलदारांची शासकीय निवासस्थान याची देखभाल करणारे कोतवाल विष्णू सुरपाटणे यांनी २७ जून रोजी दुपारी तहसीलदार यांच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या खिशात चिठ्ठी सुद्धा आढळली हाेती़ त्यामध्ये तीन नावांचा उल्लेख त्यांनी केलेला होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
याप्रकरणी मृतक व्यक्तीचा मुलगा दर्शन विष्णू सुरपाटणे यांनी या प्रकरणी बोराखेडी पोलीस स्टेशनला २८ जून रोजी फिर्याद दिली असून मोताळा तहसील कार्यालयात कार्यरत तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतक व्यक्तीच्या चिठ्ठीमध्ये तसेच देण्यात आलेल्या फिर्यादीमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास बोराखेडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक ठाणेदार राहुल जंजाळ करीत आहेत.
महिला कर्मचाऱ्याबरेाबर सेटींग लावण्यासाठी दबाव
तिन्ही आरोपींनी मृतक व्यक्तीस दोन महिला कर्मचाऱ्यांसोबत सेटिंग लावून देण्यासंदर्भात दबाव आणत होते व तसे न केल्यास पगार व टीएडीए काढणार नाही अशी धमकी देत हाेते, असा उल्लेख फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. मृतक व्यक्तीचा मुलगा दर्शन सुरपाटणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे वडील मागील काही दिवसांपासून आरोपींच्या त्रासामुळे दबावात होते. २६ जून रोजी सायंकाळी नंदकिशोर पाखरे याने विष्णू सुरपाटणे यांना फोन करून तहसील कार्यालयात बोलविले होते होते. त्यावेळी ते खूप तणावात हाेते,असेही फिर्यादीत म्हटले आहे़