लाेकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा: येथील बसस्थानकावर कुरियरमध्ये आलेले संशयास्पद बॉक्स ताब्यात घेताना गोपाल रामसिंग शिराळे (रा. साखरखेर्डा) यास अकोला एटीएसच्या पथकाने साखरखेर्डा पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्याच्याकडील बॉक्समधून दोन पिस्तुल व मॅगझिन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे साखरखेर्डा परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीची गुन्हेगारीचीही पार्श्वभूमी असल्याचेही तपासात समोर येत आहे. साखरखेर्डा बसस्थानकावर कुरीयर वाल्याकडून एक पार्सल घेवून जात असताना गोपाल रामसिंग शिराळे यास अटक करण्यात आली. मात्र तो पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र सतर्क असलेल्या पोलिसांनी त्याला लगेच पकडले. दरम्यान तेथून त्यास साखरखेर्डा पोलिस ठाण्यात तेथून आणण्यात आले. तेथे पंचासमक्ष त्याच्या ताब्यताील कुरीयद्वारे आलेला बॉक्स उघडण्यात आला. तेव्हा त्यात दोन पिस्तुल व मॅगझीन जप्त करण्यात आले आहे. सोबतच तीन काडतुसेही पोलिस यंत्रणेने ताब्यात घेतली असल्याची माहिती आहे.दरम्यान संबंधीत आरोपीसोबत गावातील आणखी कोणाचा संबंध आहे का? याचाही तपास सध्या अकोला एटीएस व पोलिस करत आहे. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी आरोपी गोपाळ रामसिगं शिराळे विरोधात साखरखेर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणेदार ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी दिली.
पिस्तुलचा वापर कशासाठी?गोपाळ रामसिंग शिराळे याने दोन पिस्तुल व मॅगझीन असलेले पार्सल स्वीकारले आहे. दरम्यान साखरखेर्डा येथे पार्सलद्वारे हे दोन पिस्तुल मागविण्याचे काम काय? त्याचा कशासाठी वापर होणार होता. यापूर्वीही अशाच पद्धतीने पिस्तुल किंवा तत्सम बाबी आणल्या गेल्या होत्या का? या दिशेने सध्या अकोला एटीएस व पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, मेहकरचे एसडीपीअेा आणि साखरखेर्डा येथील ठाणेदार या प्रकरणाच्या अनुषंगाने एटीएसला अधिक सहकार्य करीत असल्याची माहिती आहे.