बुलडाणा : रामरक्षा इंग्लिश स्कूलची केलेली तक्रार मागे घेण्यासाठी एक लाख रूपयाची खंडणी घेताना प्रमोद लक्ष्मण क्षीरसागर यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. यासंदर्भात माहिती अशी की, मुठ्ठे ले-आउट येथे रामरक्षा इंग्लिश स्कूल आहे. जैस्वाल ले-आउट येथील रहिवासी प्रमोद लक्ष्मण क्षीरसागर यांनी या शाळेची शिक्षण विभागाकडे मागील काही दिवसांपूर्वी तक्रार केली होती. सध्या हे प्रकरण अमरावती येथील शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयात सुरू आहे. ही तक्रार मागे घ्यावी, या संदर्भात संस्थाचालक नीलेश तायडे यांनी वारंवार विनंती केली होती. अखेर ही तक्रार मागे घेण्यासाठी दोघांमध्ये तडजोड झाली. यात तक्रार मागे घेण्यासाठी क्षीरसागर यांनी आठ लाख रुपयांची नीलेश तायडे यांच्याकडे मागणी केली. यामध्ये पहिला हप्ता एक लाख रूपये १८ डिसेंबर रोजी देण्याचे ठरले. यासंदर्भात तायडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे रीतसर तक्रार केली. चिखली रोडवर एका टपरी दुकानात पैसे देण्याचे ठरले. याठिकाणी आधीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून ठेवला होता. ठरल्याप्रमाणे प्रमोद लक्ष्मण क्षीरसागर घटनास्थळी आला व त्याने नीलेश तायडे यांच्याकडून एक लाख रुपयाची खंडणी स्वीकारताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत बांगर यांच्या नेतृत्वात त्यांच्या पथकाने छापा मारून क्षीरसागर यास पैसे घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणाची आता पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. यात आणखी काही मासे गळाला लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
एक लाखाची खंडणी घेताना एकास अटक
By admin | Published: December 19, 2014 1:14 AM