मोताळा : श्रीनाथ ट्रेडींग कंपनी स्थापन करून कापूस विक्रीच्या व्यवसायाच्या माध्यमातून एक कोटी ६० लाख रुपयांचा राज्य शासनाचा विक्रीकर बुडवल्याप्रकरणी या कंपनीच्या तीन जणांविरोधात बोराखेडी पोलिसांनी १२ जून रोजी रात्री तीन जणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून यात काही शासकीय अधिकार्यांचाही समावेश असू शकतो असे पोलिसांचे म्हणणे आहे.या प्रकरणी खामगाव येथील सहाय्यक विक्रीकर आयुक्त किशोर ढोले यांनी बोराखेडी पोलिसांत १२ जून रोजी सायंकाळी तक्रार दिली आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील खामखेड येथे कागदोपत्री श्रीनाथ ट्रेडिंग कंपनी दाखवून त्याची खामगाव येथील विक्रीकर कार्यालयात नोंदणी करण्यात आली होती. या माध्यमातून सुमारे २५ ते ३० कोटी रुपायंचा कापसाचा व्यवसाय करून त्यापोटी विक्रीकर म्हणून भरावयाच्या एक कोटी ६० लाख ३० हजार रुपयांचा भरणा विक्रीकर कार्यालयात न करण्यात आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश मधुकर शिंगारे (रा. खामखेड), उद्यकुमार शुक्ला (रा. बुलडाणा) आणि शेखर जैन (इंदूर, मध्यप्रदेश) अशा तिघांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बोराखेडीचे ठाणेदार अविनाश भांबरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.उपरोक्त तिघांनी ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून जो व्यवसाय केला त्याच्या कराचा भरणा हा विक्रीकर कार्यालात केला नव्हता. त्यामुळे विक्रीकराचे एक कोटी ६० लाख ३० हजार रुपयांचे राज्य शासनाचे नुकसान झाल्याचे सहाय्यक विक्रीकर आयुक्त किशोर ढोले यांचे म्हणणे आहे. तशी तक्रार त्यांनी बोराखेडी पोलिसांत दिलेली आहे. या सोबतच १५ डिसेंबर २०१० ते १२ जून २०१३ या कालावधीत संबंधीत ट्रेडिंग कंपनीच्या नावाने व्यवहार झाले असून त्याचा तीन वर्षाचा अंकेक्षणाचा अहवालही सादर न करता ही फसवणूक करण्यात आली असल्याचे सहाय्यक विक्रीकर आयुक्त खामगाव यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.
एक आरोपी टॅक्सी चालकया प्रकरणात गुन्हा दाखल झालेला एक आरोपी मुकेश मधुकर शिंगारे हा टॅक्सी चालक असल्याचे विक्रीकर आयुक्त कार्यालयाच्या चौकशीमध्ये समोर आले असल्याचे ठाणेदार अविनाश भांबरे यांचे म्हणणे आहे. कापूस विक्रीचा व्यवसाय या ट्रेडींगच्या माध्यमातून होत होता, असे ते म्हणाले.
मोठी साखळी असण्याची शक्यताया प्रकरणाच्या तपासात पोलिस शिरले असून फसवणूक करणारी ही मोठी साखळी असल्याचे प्रथम दर्शनी जाणवत आहे. यात प्रसंगी काही सरकारी अधिकारीही समाविष्ठ आहेत का? याचा तपासही पोलिसांना करावा लागणार आहे. सोबतच खामखेड येथे प्रत्यक्षात ही कंपनी अस्तित्वात होती किंवा आहे हे ही लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ते आरोपी प्रत्यक्ष संबंधीत गावातच राहतात की नाही हे ही शोधणे गरजेचे आहे, असे ही ठाणेदार भांबरे लोकमतशी बोलताना म्हणाले.