बुलडाणा: स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारावर बुलडाण्यातील बालाजीनगर परिसरात छापा मारून तब्बल २७ क्विंटल गांजा जप्त केला आहे. बाजारभावानुसार एक कोटी रुपयांच्या घरात या गांजाची किंमत असून प्रकरणी एका वाहनासह दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.कारवाईत जप्त करण्यात आलेला गांजा मोजण्यासाठी १७ कर्मचाऱ्यांना सात तासांपेक्षा अधिक कालावधी लागला आहे. वृत्त लिहीपर्यंत या गांजाची मोजदाद सुरूच होती. सायंकाळ झाल्यामुळे प्रकाश व्यवस्थेत हा गांजा मोजून तो ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बुलडाण्यात गांजा सापडेल अशी कल्पनाही पोलिसांना नव्हती. मात्र गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी बालाजीनगरातील काहीशा अडगळीसारख्या जागेत दक्षीण मुखी असलेल्या घरात जावून पाहणी केली असता गांजाचे मोठे घबाडच पोलिसांना मिळून आले. सायंकाळी सव्वा सहा पर्यंत २७ क्विंटल गांजाची मोजदाद झाली होती. यात आणखी वाढ होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.प्रकरणी बुलडाणा जिल्ह्यातील कुºहा-गोतमारा येथील मनोज झुलालसिंग झाडे आणि गजानन सुज्ञान मंजा या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. यासोबतच एक चार चाकी वाहनही जप्त करण्यात आले असून या वाहनातही गांजा ठेवण्यात आला असल्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख, पोलिस अधिकारी पांडुरंग इंगळे, इम्रान इनामदार, मुकूंद देशमुख, गजानन काळे, गिता बामणदे, सुनील खरात, संजय नागवे, अत्ताउल्ला खान यांच्यासह जवळपास १७ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत एनडीपीएस कायद्यानुसार (१९८५) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.