मेहकर (बुलढाणा) - भरधाव दुचाकी उभ्या टिप्परवर आदळल्याने भालेगाव येथील माजी सरपंच जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना २ ऑक्टोबर रोजी रात्री मेहकर ते जानेफळ मार्गावर घडली. सुरेश विठोबा धोंडगे (४५, रा. भालेगाव) असे मृतकाचे नाव आहे. या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने टिप्पर पेटवून दिले.
भालेगावचे माजी सरपंच सुरेश विठोबा धोंडगे व भगवान सुखदेव निकस (४२) दोघे मोहदरी येथे कामानिमित्त जात होते. दरम्यान मेहकर-जानेफळ रस्त्यावर समृद्धी महामार्गाजवळ एक टिप्पर रस्त्यात बंद अवस्थेत उभे होते. टिप्पर चालकाने रेडियम किंवा पाठीमागे असलेले लाईट बंद ठेवलेले असल्याने धोंडगे यांना टिप्पर दिसले नाही. त्यामुळे त्यांची दुचाकी टिप्परवर धडकली. यात सुरेश धोंडगे यांचा जागीच मृत्यू झाला तर निकस गंभीर झाले.
जखमी निकस यांना तातडीने उपचारासाठी संभाजीनगर येथे हलविण्यात आले. दरम्यान, अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने टिप्पर पेटवून दिले. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टिप्पर विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी पोलिसांवरही काही जणांनी दगडफेक केल्याची माहिती आहे. पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.