लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : भाऊबंदकीतील वादानंतर पोलिसांनी योग्य न्याय न देता मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी अमडापूर पोलिस ठाण्यासमोर ७ जून रोजी सुरू केलेले उपोषण पोलिसांनी कथितस्तरावर दमदाटी करून मागे घेण्यास भाग पाडल्यामुळे एकाने विषारी अैाषध प्राशन केल्याची घटना ८ जून रोजी सकाळी अमडापूर येथे घडली. दरम्यान या प्रकरणी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी करून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी स्पष्ट केले आहे.अमडापूर येथील श्याम राऊत व त्यांचे भाऊ गजानन राऊत यांचा त्यांच्या भाऊबंधांशी मार्च महिन्यात वाद झाला होता. याप्रकरणात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात श्याम राऊत यास अमडापूर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणात दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी श्याम राऊत यांनी ७ जून रोजी सायंकाळी अमडापूर पोलिस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले होते. दरम्यान हे उपोषण ठाणेदार अमित वानखेडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दमदाटी करून मोडीत काढल्याचा आरोप विषय प्राशन करणाऱ्या श्याम राऊत यांचे भाऊ गजानन राऊत केले आहे. सध्या श्याम राऊतवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.
दोन पोलिसांना कारणे दाखवा नोटीसमार्च महिन्यातील या घटनेप्रकरणी एसडीपीओ रमेश बरकते यांनी चौकशी करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे बिट बदललेले आहेत. सोबतच संबंधितांना त्यांची एक वेतनवाढ का रोखण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीसही बजावलेली आहे.
ठाणेदारांची बदलीअमडापूरचे ठाणेदार अमित वानखेडे यांची बुलडाणा येथे जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. कौटुंबिक कारणावरून त्यांनी बदली करण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरियांनी दिली. दरम्यान, त्यांच्या जागी अमडापूरचा प्रभारी पदभार एलसीबीचे एपीआय नागेशकुमार चतरकर यांच्याकडे देण्यात आला असल्याची माहिती आहे.