लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तालुक्यातील गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात २३ आॅगस्ट रोजी जलसाठा १०० टक्के झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आता पाऊस झाल्यास धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील ३७ गावांमध्ये पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे तसेच गुरे-ढोरे सुरक्षित स्थळी ठेवण्याचेही सरपंच, सचिवांना पत्रातून बजावण्यात आले आहे.तांदुळवाडी सिंचन शाखेअंतर्गत येणाऱ्या ज्ञानगंगा प्रकल्पात १३ आॅगस्ट रोजीच ८५.०४ टक्के जलसाठा झाला होता. त्यानंतर दहा दिवसात म्हणजेच २३ आॅगस्ट रोजी प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे खामगावसह नांदुरा शहराची पिण्याच्या पाण्याची समस्या सद्यस्थितीत मिटली आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच बुलडाणा जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. ज्ञानगंगा प्रकल्पात मोठ्याप्रमाणात जलसंचय झाला. त्यामुळे खामगाव, नांदुरा या दोन शहराच्या पेयजलाची समस्या निकाली निघाली आहे. ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पातून खामगाव औद्योगिक क्षेत्र तसेच कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी दिले जाते. ग्रामीण भागातील ज्ञानगंगा नदीकाठी असलेल्या भालेगाव बाजार, काळेगाव, पोरज, दिवठाणा, रोहणा, निमकवळा, ढोरपगाव, हिवरा बु., जळका भडंग या गावांना पाणीपुरवठा करणाºया विहिरी ज्ञानगंगा नदीच्या काठावर आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास धरण केव्हाही पूर्ण क्षमतेने भरून सांडवा प्रवाहीत होण्याची शक्यता आहे.
पलढग मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’बुलडाणा : मोताळा तालुक्यातील विश्वगंगा नदीवरील पलढग मध्यम प्रकल्प पाण्याने तुडूंब भरला आहे.. सततच्या पावसाने प्रकल्प ओव्हर फ्लो झाला असून सांडव्यावरून नदीपात्रात पाणी येत आहे. पलढग प्रकल्पाची प्रकल्पीय संकल्पीत साठा ७.५१ दलघमी असून पुर्ण संचय पातळी ४०३.२० मीटर आहे. धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहे. तसेच दे. राजा तालुक्यातील अंढेरा हा लघु पाटबंधारे प्रकल्प आज सकाळी ६ वाजता १०० टक्के भरला आहे.