लोकमत न्यूज नेटवर्क
साखरखेर्डा : ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर जय-पराजयाच्या कारणावरून उदभवलेल्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना १८ जानेवारी रोजी रात्री साखरखेर्डा येथे घडली.
ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद उकरून काढत शे. तौफिक शेख गुलशेर यांच्यासह आठ व्यक्तींनी शेख रशीद शेख निसार यांच्यासह त्यांची पत्नी आणि बहिणीला जबर मारहाण केली. यात या मारहाणीत शेख रशीद हा गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झाल्याने पोलिसांनी शेख रशीद यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ झाल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने चिखली येथे हलविण्याचा सल्ला दिला . याप्रकरणी १९ जानेवारी रोजी साखरखेर्डा पोलिसांनी जबाब नोंदविला असता, घरातील सामानाची नासधूस करून कपाटातील ३५ हजार रुपये चोरून नेल्याची माहिती शे. रशीद यांनी पोलिसांना दिली. त्यांच्या जबाबावरून पोलिसांनी आठ व्यक्तींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. तर विरुद्ध गटातील रिझवानाबी या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिसांनी शेख रशीदसह सात ते आठ व्यक्तींविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक दीपक राणे करीत आहेत .