लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: टिप्पर व दुचाकीची चिखली तालुक्यातील केळवद गावानजीक समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुचाकीवरील युवतीसह टिप्परमधील तीन मजूर असे चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात १२ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास बुलडाणा-चिखली मार्गावर घडला. दरम्यान अपघातातील जखमी युवती गंभीर असून तिच्यावर बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.बुलडाणा येथील सर्वेश जोशी (२२) व साक्षी कपाटे (१९) हे दोघे दुचाकीद्वारे चिखलीच्या दिशेने जात होते. दरम्यान केळवद गावानजीक बुलडाण्याच्या दिशेने रेती घेऊन एक टिप्पर येत होता. त्यावेळी भरधाव वेगातील दुचाकीची आणि टिप्परची धडक वाचविण्याचा टिप्पर चालकाने प्रयत्न केला. परंतू दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन टिप्परही या घटनेत उलटला व रेतीखाली दोन मजूब दबले होते. अपघाताची भिषणता अधिक होती. त्यात सर्वेश जोशी याचा जागीच मृत्यू झाला तर साक्षी कपाटे(रा. बुलडाणा), टिप्पर मधील मजूर रमेश बाबुराव चव्हाण (४५), शाम नर्सिंग चव्हाण (४२) आणि विश्वास वासुदेव राठोड (२०) (तिघे रा. पळसखेड नाईक) हे जखमी झाले. या चौघांना उपचारासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयत दाखल करण्यात आले आहे. दरम्यान साक्षी संजय कपाटे हीची प्रकृती गंभीर असल्याने तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
केळवद नजीक टिप्पर-दुचाकीच्या धडकेत एक ठार, चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 12:13 PM