नीलेश जोशी, बुलढाणा: शहरापासून १४ किमी अंतरावर असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यामधील देव्हारी वनग्राम परिसरात शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान प्रादेशिक वनविभाग व वन्यजीव विभागाची प्रत्येकी एक पथक तसेच बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्याचे एक पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.
वन्यजीव विभागाचे अधिकारी चेतन राठोड यांनी या घटनेस दुजोरा दिला आहे. लोणार येथे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीस ते गेले होते. त्यामुळे तेही लोणार येथून आता ज्ञानगंगा अभयारण्याच्या दिशेने निघाले आहेत. खामगाव येथील वन्यजीव विभागाचे अधिकारी दीपेश लोखंडे, बुलडाणा प्रादेशिक विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे हेही घटनास्थळावर थोड्याच वेळात पोहचत आहे.
देव्हारी गावातील ३८ वर्षीय शेतकरी हा शेतात काम करत असताना त्याचा आणि बिबट्याचा समोरासमोर सामना झाला. त्यात शेतकऱ्याने बिबट्याला प्रतिकेला केला. परंतू बिबट्याने त्यास गंभीर दुखापत केली. संबंधित शेतकऱ्याचा आवाज ऐकल्यानंतर आसपासचे लोक त्याच्या दिशेने धावले. त्यानंतर बिबट्याला तेथून पिटाळून लावण्यात आले. मात्र या घटनेत ३८ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती वन्यजीव विभागाच्या सुत्रांनी दिली.
एप्रिल महिन्यातही महिलेवर बिबट्याने केला होता हल्ला
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या एका महिलेवरही बिबट्याने हल्ला केला होता. त्यावेळी वन्यजीव विभागाने देव्हारी गावाच्या परिसरात ८ ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले होते. मात्र त्यानंतर हल्ला करणाऱ्या बिबट्याचा मात्र शोध लागला नव्हता. आता शेतकऱ्यावर हल्ला करणारा तोच बिबट्या आहे की दुसरा बिबट्या आहे हे ही पहाणे गरजेचे झाले आहे.