बुलडाणा : नारळ घेऊन जाणारा ट्रक शहरानजीकच्या राजूर घाटात हनुमान मंदिरानजीक दरीत कोसळून त्यामध्ये ट्रकचालकाचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात ११ मे रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, बुलडाणा अग्निशामक दलाच्या पथकाने पोलिसांच्या सहकार्याने यातील गंभीर जखमीस बाहेर काढून बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या अपघातामध्ये दीन मोहम्मद (रा. अल्वर जिल्हा, राजस्थान) हा ठार झाला असून, त्याचा सहकारी शेरूल मोजेखान (रा. अल्वर जिल्हा, राजस्थान) हा जखमी झाला आहे. बुलडाणा शहरानजीक असलेल्या राजूर घाटात ११ मे रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये राजूर घाटातील हनुमान मंदिरानजीक ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक थेट ४०० फूट दरीत कोसळला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बुलडाणा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस व पालिकेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून दरीतून जखमी व्यक्तीस बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत त्यास रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, मृत दीन मोहम्मद याचे पार्थिव हे जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आले आहे. या अपघात प्रकरणाचा पुढील तपास बुलडाणा शहर पोलीस करीत आहेत.
ट्रक दरीत कोसळून एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 8:10 PM