नांदुरा : अवैधपणे रेती नेणारे टिप्पर हिंगणा ते दादगाव दरम्यान उलटल्याने त्याखाली मलकापूरमधील चार मजूर दबले. दबलेल्या मजुरांना जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले. त्यापैकी तीन गंभीर जखमी झाले. एका मजुराला पुढील उपचारासाठी अकोल्याला नेत असल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना १३ जूनच्या रात्री अकरा वाजताच्या दरम्यान घडली.पूर्णा नदी तीरावरील हिंगणा, भोटा, येरळी, रोटी, बेलाड, गौलखेड या गावांमध्ये पूर्णा नदीपात्रातील रेती सरकारी जागेवर आणून हजारो ब्रास रेतीचे शेकडो साठे तयार केले आहेत. त्या साठ्यातून अवैध रेती वाहतूक करताना टिप्पर क्रमांक एमएच-२१ एक्स-४४२१ चा चालक दशरथ ठाकरे याने भरधाव वाहन चालवले. टिप्पर हिंगणा ते दादगाव दरम्यान उलटले. त्यावेळी मजूर सलमान खान अयुब खान (वय २१), भिकनशाह रहिमशाह (वय २१), सोहिल शाह मुनाब शाह (वय १९), समीर शाह हईम शाह (वय १८) हे सर्व टिप्परखाली दबले. याबाबतची माहिती रात्रीच्या वेळी लोकेशनवर असलेल्या रेती माफियांनी मिळताच त्यांनी व काही सामाजिक कार्यकर्त्यानी घटनास्थळी धाव घेतली. मजुरांना जेसीबीच्या साहाय्याने काढून प्रथम त्यांना नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यानंतर खामगाव येथे उपचाराकरीता भरती करण्यात आले. मात्र, सोहिल शाह मुनाब शाह याला अकोला येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या अपघात याप्रकरणी जलंब पोलिसांनी चालक दशरथ ठाकरे रा. वाघूड तालुका मलकापूर याच्याविरूध्द गुन्ह्याची नोंद केली. या अपघाताची माहिती मिळताच युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस निलेश पाऊलझगडे, विनल मिरगे, ओमसाई फाऊंडेशनचे विलास निंबोळकर, प्रवीण डवंगे, आनंद वावगे, अमोल घोराडे यांनी तात्काळ जेसीबी बोलावून मजुरांना बाहेर काढले. त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ हलविले .
टिप्परखाली दबल्याने एकाचा मृत्यू, तीघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 6:03 PM