लोकमत न्यूज नेटवर्कधाड : बुलडाणा तालुक्यातील मढ येथे एकाचा पूर्व वैमनस्यातून खून झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर झाडाझुडपात खोदण्यात आलेल्या गड्डय़ात मृतदेह पुरण्यात आला होता.धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या मढ येथील विजय पुनीलाल चांदा (३६) हे १३ जानेवारी रोजी बेपत्ता झाले होते; मात्र नातेवाइकांनी १४ जानेवारी रोजी शोध घेऊनही ते सापडले नाहीत. दरम्यान, विजय चांदा यांचा भाऊ राजू पुनीलाल चांदा यांनी १५ जानेवारी रोजी ते बेपत्ता झाल्याची तक्रार धाड पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून बेपत्ता व्यक्तीच्या कुटुंबियांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. दरम्यान, मढ येथील पैनगंगा नदीच्या पुलाजवळच्या रस्त्यावर संशयास्पद स्थितीत रक्ताचे डाग आणि विजय चांदा यांची चप्पल दिसल्यामुळे बेपत्ता इसमाच्या नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. यावरून पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले असता, श्वानाने रक्ताचे डाग असलेल्या रस्त्यावर २ कि.मी. अंतरावरील चिचतळ्य़ानजीक एका खड्डय़ाजवळ पोलिसांना नेऊन पोहोचवले. त्या खड्डय़ात बेपत्ता असलेल्या विजय चांदा याचा खून करून त्यांचे पार्थिव गाडण्यात आल्याचे दिसून आले. त्यानुषंगाने नंतर पोलिसांनी पंचनामा करून मृत विजय चांदाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून विजय चांदा यांचा पूर्व वैमनस्यातून ईश्वर रामचंद्र बालोद, त्याची तीन मुले दिवान बालोद, महिपाल बालोद, गोपाल बालोद आणि विजय नारायण बालोद यांनी खून केल्याचा संशय व्यक्त करीत पाचही जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली धाडचे ठाणेदार संग्राम पाटील, पोलीस कर्मचारी गजानन मुंडे आणि सहकारी करीत आहेत.
२0१५ मध्ये झाला होता वादसाधारणपणे २0१५ मध्ये मृत विजय चांदा याच्या तक्रारीवरून धाड पोलिसांनी महीपाल बालोद व इतरांवर युवतीची छेड काढण्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला होता. तर याच घटनेत महीपाल बालोद याच्या तक्रारीवरून विजय चांदा व इतरांवर गंभीर मारहाणीचे गुन्हे दाखल केले गेले होते. हे प्रकरण तीन वर्षांपासून न्यायप्रविष्ठ होते. दरम्यान, याचाच राग मनात धरून विजय चांदाचा खून झाल्याचा संशय मृत विजयच्या नोतवाइकांनी दिली. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांना बुलडाणा येथे वैद्यकीय तपासणीसाठी सायंकाळी आणण्यात आले होते.