सीबीएसईने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र, राज्य शासनानेसुद्धा दहावीच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी भूमिका घेणारा पालकांचा एक गट आहे. दहावीची म्हणजे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवासाचा पहिला टप्पा आहे. त्यामुळे परीक्षा न घेता दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे योग्य नाही, असे मानणारा पालकांचा दुसरा गट आहे. यावर्षी जिल्ह्यातून सीबीएसई दहावीच्या परीक्षेसाठी एक हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्य शासनाने सीबीएसईप्रमाणे निर्णय घेऊ नये, असे स्पष्ट मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले. तसेच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीसुध्दा याबाबत विचार करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे दहावीच्या
विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, सर्व विद्यार्थ्यांनी याबाबत विचार न करता अभ्यास सुरू ठेवावा, असे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्याकडून सांगितले जात आहे.
सीबीएसई दहावीच्या एकूण शाळा
१५
सीबीएसईचे दहावीतील एकूण विद्यार्थी
१०००
जे विद्यार्थी हुशार आहेत, मेरीटमध्ये येणार आहेत, त्यांच्यामध्ये या निर्णयामुळे नाराजी आहे. पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे मागील गुण भरावेच लागतात. त्यामुळे परीक्षा जरी रद्द झाल्या तरी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार आहे. बोर्डाच्या सूचनेनुसार पुढील अंमलबजावणी करण्यात येईल.
गजानन निकस, प्राचार्य, सीबीएसई स्कूल, मेहकर.
दहावीची परीक्षा घेणे आवश्यक असले, तरी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे सीबीएसईप्रमाणे राज्य शासनाने एसएससी बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात.
- संजय देशमुख, पालक.
दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतरच शासनाने परीक्षा घ्यावी. परीक्षा रद्द करण्याची घाई करू नये. विद्यार्थांना परीक्षा न घेता उत्तीर्ण करणे योग्य नाही.
- विजय क्षीरसागर, पालक.