प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मोताळा येथील पंडितराव कैलासराव देशमुख यांना त्यांना खोकला आल्यामुळे २५ फेब्रुवारी रोजी सकाळी तपासणीसाठी मोताळा येथील कोविड केअर सेंटर गाठले होते. या ठिकाणी त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांकाची नोंद घेण्यात आली. मात्र त्यांना स्वॅब देण्यासाठी दुपारी बोलावण्यात आले होते. परंतु पंडितराव देशमुख पुन्हा कोरोना केंद्रात गेलेच नाहीत. दरम्यान, आठवडाभरानंतर शुक्रवार ५ मार्च रोजी कोविड केअर सेंटरमधील कर्मचाऱ्याने पंडितराव देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला व त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. त्यामुळे देशमुख यांना धक्काच बसला. या प्रकरणी देशमुख यांनी आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवत संताप व्यक्त केला आहे.
या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती घेतली असता देशमुख यांनी नोंदणी केल्यावर स्वॅब घेण्यासाठी त्यांच्या नावाचा ट्यूब तयार करण्यात आला होता. त्यात दुसऱ्याच व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आरोग्य विभाग पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहे.
जिल्हाभरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना, घडलेल्या या प्रकाराची गंभीरतेने दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई करण्यात येईल. ज्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्याचा सध्या शोध घेण्यात येत आहे.
-डॉ. रवींद्र पुरी,
तालुका आरोग्य अधिकारी, मोताळा
मला खोकला असल्याने स्वॅब तपासणीसाठी गेलो होतो. त्यांनी नोंदणी करून दुपारी येण्यास सांगितले. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव स्वॅब देण्यास पुन्हा जाता आले नाही. तरीसुद्धा माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा फोन आला. सदर प्रकार हलगर्जीपणाचा कळस गाठणारा आहे.
-पंडितराव देशमुख, रा. मोताळा.