बुलडाणा : कांद्याचे भाव पुन्हा २० ते २५ रुपयांनी वाढल्याचे रविवारी चित्र हाेते. गेल्या आठवड्यात कांद्याचे भाव ३० रुपये हाेते. तसेच भाजीपाल्याची आवक कायम असल्याने भाव कमी झाले आहेत. दुसरीकडे फळांची आवक कमी झाल्याने भाव माेठ्या प्रमाणात वाढले आहेत.
बाजारात भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला असून, गत सप्ताहाप्रमाणेच पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत. कांदा, बटाट्याचे दरही आता कमी झाले आहेत. आता बहुतांश भाज्यांचे दर कमी झालेले आहेत. फळबाजारात सफरचंद, माेसंबी, संत्रा आदींची आवक माेठ्या प्रमाणात कमी झाल्याने भाव जवळपास दुपटीने वाढले आहेत. किराणा साहित्यामध्ये तेलाचे भाव वाढल्याचे चित्र आहे. गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यातही भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाल्याचे चित्र आहे.
सफरचंद १५० रुपयांवर
गत आठवड्यापासून फळांची आवक घटली आहे. त्यामुळे फळांच्या भावात माेठी वाढ झाली आहे. चांगल्या प्रतीचे सफरचंद १२० ते १५० रुपये प्रत्येक किलाेप्रमाणे विकले जात आहेत. माेसंबीचे भावही माेठ्या प्रमाणात वाढले आहेत. डाळिंब गत आठवड्यात ६० रुपयांप्रमाणे विकले गेले हाेते. या आठवड्यात डाळिंबाचे भाव १५० रुपयांवर गेले आहेत. पपई व संत्र्यांच्या भावातही वाढ झाली आहे.
भाजीपाल्याची आवक वाढलेली असल्याने भाव कमी झाले आहेत. मिरची, वटाणा आदींचे भाव गत आठवड्याच्या तुलनेत कमी झाले आहेत.
- विष्णू सुरडकर, भाजी विक्रेता
गत आठवड्यापासून फळांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे सफरचंद, माेसंबी, डाळिंब, पपईचे भाव वाढले आहेत. येत्या काही दिवसात आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे.
- इरफान बागवान, फळविक्रेता