लाेणारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या सर्व शाळा, महाविद्यालयांत ऑनलाइनद्वारे शैक्षणिक सत्रास सुरुवात झाली. यामुळे मोबाइल, लॅपटॉप, टॅबला मागणी वाढली आहे. लॉकडाऊननंतरही घरातून काम करण्याच्या सवयीमुळे अनेकांनी टॅब आणि लॅपटॉप घेण्यास अनलॉकनंतर पसंती दर्शवली. त्यामुळे मागणीत अतिरिक्त वाढ नोंदवली गेली आहे, तसेच अनेकांचे लॉकडाऊनमध्ये टॅब, लॅपटॉप, मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढल्यामुळे नेहमीपेक्षा अधिक दुरुस्ती करण्याचे प्रमाण वाढले आहे.
मोबाइलची मागणी वाढल्यामुळे साहजिकच सीमकार्ड कंपन्यांनाही ‘अच्छे दिन’ आले असून, जूनमध्ये शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने सीमकार्ड विक्रीसोबत मोबाइल रिचार्जमध्ये मोठी उलाढाल झाली आहे. टॅब, लॅपटॉप, मोबाइलमध्ये सर्वाधिक मोबाइलची विक्री झाली आहे. त्यात भारतीय बनावटीच्या मोबाइलला जास्त मागणी आहे. सीमकार्डच्या पोर्ट करण्यासोबत नवीन सीमच्या मागणीतही वाढ झाली आहे. दोन महिन्यांपासून मोबाइलची सर्व दुकाने बंद असल्याने काही जणांचे चार्जर, बॅटरी आणि अतिवापरामुळे मोबाइल बंद पडले होते. त्यामुळे दुरुस्तीसाठीही ग्राहकांची गर्दी होताना दिसली. कमी किमतीतील मोबाइलला जास्त मागणी असून, अनेक ग्राहकांचा कल मोबाइल, टॅबला असल्याचे दिसत आहे.