चिखली येथील व्यापारी बिपीन पोपट हे मोबाईल बँकिंगद्वारे त्यांचे व्यवहार करीत होते. दरम्यान ३० जून रोजी त्यांना ऑनलाईन व्यवहार करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांनी गुगलवर त्यांच्या स्टेट बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर सर्च केला होता. त्यावेळी बँकिंग सर्व्हिस नावाने त्यांना एका क्रमांकावर वारंवार फोन येऊ लागले होते. संबंधित व्यक्ती त्यांना त्यांच्या खात्याचा तपशील मागत होती. मात्र त्यांनी त्याला खात्याचा तपशील दिला नाही. असा प्रकार दोन ते तीन वेळा घडला.
दरम्यान, ७ जुलै रोजी त्यांना पुन्हा संबंधित मोबाईल क्रमांकावरून फोन आला व तुमच्या खात्यातून कोणीतरी पैसे काढत आहे. त्यामुळे तुमचा आधार कार्ड व पॅन कार्ड नंबर द्या. आपले खाते मी ब्लॉक करतो असे सांगितले. त्यामुळे बिपीन पोपट यांनी संबंधिताला तपशील दिला. दरम्यान, त्याच दिवशी त्यांच्या बँक खात्यातून एकदा १ लाख ४९ हजार ६७६ रुपये व दुसऱ्यांचा १ लाख ५० हजार रुपये असे २ लाख ९९ हजार ६७६ रुपये अज्ञात व्यक्तीने काढल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकरणी त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ऑनलाईन आर्थिक फसवणूक प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
--ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारांत वाढ--
बुलडाणा जिल्ह्यात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कधी-कधी तर नजर चुकवून एटीएमची अदलाबदली करीत वृद्धांच्या खात्यातून लाखो रुपयांची रक्कम काढण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाईन आर्थिक व्यवहार किंवा डिजिटल व्यवहारांबाबत जनमानसामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.