लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: येथील एका व्यापाऱ्याची सुमारे तीन लाख रुपयांनी ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी उघडकीस आली असून या प्रकरणी चिखली पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.चिखली येथील व्यापारी बिपीन पोपट हे मोबाईल बँकींगद्वारे त्यांचे व्यवहार करत होते. दरम्यान ३० जून रोजी त्यांना ऑनलाईन व्यवहार करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांनी गुगलवर त्यांच्या स्टेट बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर सर्च केला होता. त्यावेळी बँकिंग सर्व्हीस नावाने त्यांना एका क्रमांकावर वारंवार फोन येऊ लागले होते. संबंधित व्यक्ती त्यांना त्यांच्या खात्याचा तपशील मागत होता. मात्र त्यांनी त्यास खात्याचा तपशील दिला नाही. दोन ते तीन वेळा असा प्रकार घडला.दरम्यान, ७ जुलै रोजी त्यांना पुन्हा संबंधित मोबाईल क्रमांकावरून फोन आला व तुमच्या खात्यातून कोणीतरी पैसे कात आहे. त्यामुळे तुमचा आधार कार्ड व पॅनकार्ड नंबर द्या. आपले खाते मी ब्लॉक करतो असे सांगितले. त्यामुळे बिपीन पोपट यांनी संबंधिताला तपशील दिला. दरम्यान त्याच दिवशी त्यांच्या बँक खात्यातून एकदा १ लाख ४९ हजार ६७६ रुपये व दुसऱ्यांचा १ लाख ५० हजार रुपये असे २ लाख ९९ हजार ६७६ रुपये अज्ञात व्यक्तीने काढल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकरणी त्यांनी चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ऑनलाईन आर्थिक फसवणूक प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलिस तपास करत आहे.
चिखलीतील व्यापाऱ्याची तीन लाख रुपयांनी ऑनलाईन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 11:56 AM