अंढेरा : सध्या कोरोनाच्या विळख्यातून वाचण्यासाठी नागरिकांना आशेचा किरण ठरू पाहणाऱ्या कोरोना लसीचे गौडबंगाल वाढतच आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, लसीच्या नोंदणीसाठी कित्येक तास मोबाइलकडे पाहत बसावे लागत आहे. यावर उपाययाेजना करण्याची गरज आहे़
लसीकरणासाठी ऑनलाइन नाेंदणी करावी लागत आहे. नाेंदणी करण्यासाठी वेबसाइटवर गेल्यास आधीच बुक झाल्याचे आढळते. त्यामुळे अनेक जण लसीकरणापासून वंचित असल्याचे चित्र आहे. लस बुक करताना ओटीपी व कोड टाकावा लागत असून हेसुद्धा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी केवळ तर ४५ पुढील व्यक्तींना लसीकरणासाठी जिल्हाभरात लसीकरण केंद्र सुरू आहेत. ४५ वर्षांपुढील ज्यांनी प्रथम लस घेतली नाही ते लस ऑनलाइन व ऑफलाइन मिळेल का या आशेवर आरोग्य केंद्रावरील लसीकरण केंद्रांवर जात आहेत, मात्र लस उपलब्ध नसल्याने माघारी परतत आहे. तसेच अनेक ४५ वर्षांपुढील नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करून ठेवलेली आहे; परंतु नोंदणी केलेल्या केंद्रांवर लसच उपलब्ध नसल्याने नोंदणी करूनही ४५ वर्षांवरील नागरिक हैराण झाले आहेत.
दुसऱ्या डोससाठी ४५ वर्षांवरील नागरिक त्रस्त!
४५ वर्षांवरील नागरिकांचे ठिकठिकाणी गावात जाऊन मोठ्या प्रमाणावर व आरोग्य केंद्रांवर लसीकरण करण्यात आले़ त्यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांनी शिबिरे आयाेजित केली हाेती. पहिला डाेस घेतल्यानंतर दुसरा डाेस मिळत नसल्याचे चित्र आहे. दुसऱ्या डाेससाठी नागरिकांची भटकंती हाेत आहे़.