लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बाजारपेठेत अवैधपणे विक्री होणारा मांजा आता बहुतांश ऑनलाईन ॲपवर सर्रासपणे विकला जात आहे. या गंभीर बाबींबाबत पर्यावरणप्रेमीही गप्प आहेत. पक्षी, नागरिकांचे गळे कापल्यानंतर खरेदी-विक्री थांबणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे. मांजामुळे पक्ष्यांचा बळी जात असल्याचे लक्षात येताच मांजावर सरसकट बंदीच आणावी, अशी ओरड कधीकाळी निर्माण झाली होती. मात्र, त्यासंदर्भात कधीच कारवाई झाली नाही, ही बाब निराळी. हा गोंधळ सुरू असतानाच चायनीज नायलॉन मांजाचे आगमन झाले. या मांजामुळे थेट माणसांचेच गळे कापले जात असल्याने आणि काहींचा प्रत्यक्ष बळी गेल्यावर प्रशासनाने कागदोपत्री बंदी घातली. मात्र, त्याचा परिणाम झाला नाही.
नायलॉन मांजाची बाजारातही विक्रीबंदी असतानाही नायलॉन मांजा बाजारात उपलब्ध होतो, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडत आहे. मांजा बाजारात येऊच नये, याबाबत कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याचे स्पष्ट होते. ग्राहक स्वत:च नायलॉन मांजाच्या धोक्याबाबत जागृत नसल्याने ते या मांजाची मागणी विक्रेत्यांना करतात. विक्रेतेही पैसा कमाविण्यासाठी तो उपलब्ध करवून देतात, हे विशेष.
केवळ जप्तीची कारवाई
नायलॉन मांजामुळे इतरांस दुखापत किंवा नुकसान होत असेल तर संबंधितांवर आर्थिक दंडाचे विधान बॉम्बे पोलीस ॲक्टमध्ये आहे. कुणाचा मृत्यू झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही नोंदविण्याची तरतूद आहे. मात्र, धारदार शस्त्रासारखा असलेला हा मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर केवळ साहित्य जप्तीचीच कारवाई केली जाते.