बुलडाणा : ऑनलाईन शाळा सुरू होऊन महिना उलटत आला तरी पुस्तकांचे वितरण अद्याप झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांविना वर्ग करावे लागत आहेत. पुनर्वापरासाठी पुस्तके परत करण्याला काही ठिकाणीच प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुलांना जुन्या पुस्तकांचा आधार मिळाला आहे. पुस्तके या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
सर्व शिक्षा अभियानाच्या वतीने जिल्हा परिषद, नगर पालिका आणि खासगी अनुदानित शाळांतील पहिली ते
आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याची योजना आहे. दरवर्षी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके दिली जातात. परंतु, यंदा पुस्तके दिली नाहीत. बालभारतीकडून पुस्तके वाटपाचे
वेळापत्रक प्राप्त न झाल्याने वितरण झाले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पुस्तके मिळण्याची प्रतीक्षा आहे. यामध्ये केवळ जिल्हा परिषद शाळेचेच नव्हे, तर नगर पालिका शाळा, मराठी माध्यम, उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके कधी मिळतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
८० टक्के मुलांनी पुस्तके केली परत
सर्व शिक्षा अभियानाने गतवर्षी वितरित केलेली पुस्तके पुनर्वापरासाठी शाळेत परत करावीत, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनानुसार ८० टक्के पुस्तके जमा करण्यात आली आहेत. नवी पुस्तके वितरित होताना या पुस्तकांचाही वापर केला जाणार आहे. कोरोनापुळे गेल्या दीड - दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत.
पुस्तके नाहीत अभ्यास कसा करणार?
शाळेतून पुस्तके मिळणार असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी पुस्तके विकत घेतली नाहीत. शाळाही भरत नाही. ऑनलाईन वर्ग आहेत. पुस्तके नसल्यामुळे अभ्यासही करता येत नाही. ऑनलाईन शाळा आहे. परंतु, पुस्तक नसल्याने वाचन होत नाही. शाळेत असताना सर फळ्यावर लिहून देत होते. आता ऑनलाईन वर्ग असल्यामुळे तेही शक्य नाही. त्यामुळे अभ्यास कसा करणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे.
२ लाख ६१ हजार विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची मागणी
जिल्ह्यातील २ लाख ६१ हजार ४३६ विद्यार्थ्यांसाठी २०२१ - २२ या शैक्षणिक वर्षासाठी पुस्तकांची मागणी म. प्रा. शि. प., मुंबई यांच्याकडे प्रस्तावित केलेली आहे. त्यानुसार पुस्तके या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होतील.
उमेश जैन, उपशिक्षणाधिकारी, बुलडाणा
वर्गनिहाय विद्यार्थी
संख्या
पहिली -४२,०११
दुसरी - ४५,५७२
तिसरी - ४६,३९३
चौथी- ४६,९५१
पाचवी- ४६,७४३
सहावी - ४६,६१२
सातवी- ४६,५९०
आठवी- ४५,१०५