- अनिल गवई
खामगाव : खामगाव आणि नांदुरा शहराला पाणी पुरवठा करणाºया गेरू माटरगाव येथील धरणात केवळ १५ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने, उपरोक्त दोन्ही शहरांमध्ये आगामी काळात ‘पाणीबाणी’चे संकेत आहेत. परिणामी, पाणीबाणीच्या काळात धरणापासून जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी दोन्ही पालिका प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत धरणावरून जॅकवेलचा पहीला रोज पिस उघडा पडला असून, येत्या आठवड्यात दुसरा पिसही उघडा पडणार असल्याची शक्यता आहे.
अत्यल्प पावसामुळे खामगाव तालुक्यातील गेरू माटरगाव येथील धरणातील पाणी पातळी बरीच खोल गेली आहे. धरणात जानेवारी अखेरीस १५ टक्के जलसाठा उपलब्ध असून, खामगाव पाणी पुरवठा योजनेसाठी प्रतितास ६.२५ लक्ष लीटर तर नांदुरा पाणी पुरवठा योजनेसाठी ३.२५ लक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असते. दरम्यान, धरणावरील जॅकवेलचा पहीला रोज पिस उघडा पडला असून, येत्या दोन-तीन दिवसांत दुसराही रोज पिस उघडा पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्यात बाष्पीभवन जास्त झाल्यास तीसरा आणि शेवटचा रोजपीस उघडा पडल्यास, धरणातून जॅकवेलमध्ये पाणी आणण्यासाठी संभाव्य उपाययोजना म्हणून पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जाताहेत. नांदुरा आणि खामगाव दोन्ही यंत्रणा एकाच विहिरीवरून पाणी उचल करीत असल्याने, संभाव्य उपाय योजना राबविण्यासाठी दोन्ही नगर पालिकेला पाणी उचलाच्या प्रमाणात खर्च करणे अपेक्षीत आहे.
गेल्यावेळी जॅकवेलमध्ये अडकला होता गाळ!
सन २०१५ मधील उन्हाळ्यात दुसरा आणि तिसरा रोज पिस गाळात फसला होता. त्यावेळी विहिरीतून पाणी येत नसल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. त्यावेळी मुंबई येथील पाणबुडे आणून गाळ काढण्यात आला होता.
पंप बसवून घेतले जाईल पाणी!
अत्यल्प पाऊस आणि धरणातील कमी झालेली जलपातळी पाहता, आपातकालीन स्थितीत पाणबुडे मागवून कालवा आणि रोज पिस जवळील गाळ काढण्यासोबतच, पंप बसवून विहिरींमध्ये पाणी घेण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित आहे.
खामगावसाठी सहा पंपाद्वारे उचल!
प्रतितास ६.२५ लक्ष लीटर पाणी धरणातील पाणी विहिरींमध्ये आणण्यासाठी तसेच यंत्रणा उभी करण्यासाठी १० एचपी चे सहा पंप धरणावर कार्यान्वित करावे लागतील. त्याअनुषंगाने यंत्रणा उभी करण्यासाठी खामगाव पालिकेने २० लक्ष रुपयांची तरतूद केली आहे. अशाप्रकारे यंत्रणा नांदुरा नगर पालिकेलाही उभी करावी लागणार असून, उपरोक्त यंत्रणेसाठी लागणारा खर्च दोन्ही पालिकांना समप्रमाणात करावा लागणार असल्याचे दिसून येते.